नाशिक : बेकायदा धारदार तलवार बाळगणा-या एकास पोलीसांनी बेड्या ठोकल्या. ही कारवाई शहर गुन्हे शाखेच्या युनिट १ च्या पथकाने बागवानपुरा भागात केली. याप्रकरणी पोलीस दप्तरी नोंद करण्यात आली आहे. मोहम्मद कैफ साजीद शेख (रा.कच्छी एन्टरप्राईजेस दुकानाच्या वर बागवाणपुरा) असे अटक केलेल्या संशयीताचे नाव आहे. बागवानपुरा येथील कैफ शेख नामक तरूणाकडे धारदार तलवार असल्याची माहिती युनिट १ च्या पथकास मिळाली होती. त्यानुसार सोमवारी (दि.१७) वरिष्ठ निरीक्षक विजय ढमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने घटनास्थळी धाव घेत संशयीताच्या घरात शिरून ही कारवाई केली. पथकाने संशयीतास बेड्या ठोकत चौकशी केली असता त्याने पलंगाखाली ठेवलेली सुमारे १ हजार रूपये किमतीची तलवार काढून दिली. याप्रकरणी आर्म अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून ही कारवाई उपनिरीक्षक जाकिर शेख,विष्णू उगले अंमलदार रामदास भडांगे,प्रविण कोकाटे,आसिफ तांबोळी,मुक्तार शेख,नाझीम पठाण,प्रतिभा पोखरकर आदींच्या पथकाने केली.