नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – चिंचोली फाटा भागात पूर्ववैमनस्यातून टोळक्याने दुचाकीस्वार भावांवर धारदार कोयत्याने हल्ला केला. या घटनेत दोघे भाऊ जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मुकेश बोडके, वैभव गोसावी, सतिश लहाने व अक्षय भिसे अशी दोघा भावांवर खूनी हल्ला करणा-या संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी राधाकिसन सोपान भिसे (३४ रा.मोह ता.सिन्नर) यांनी तक्रार दाखल केली असून नाशिकरोड पोलिस ठाण्यात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भिसे बंधू बुधवारी रात्री दुचाकीवर आपल्या घराच्या दिशेने प्रवास करीत असतांना ही घटना घडली. चिंचोली फाटा भागातून दोघे भाऊ प्रवास करीत असतांना संशयित टोळक्याने त्यांची वाट अडवित जुन्या वादाची कुरापत काढून शिवीगाळ करीत त्यांच्यावर हल्ला केला. या घटनेत राधाकिसन भिसे यांच्या डोक्यावर कोयत्याने तर भावास जीवे मारण्याच्या उद्देशाने रॉडने मारहाण करीत त्याच्यावर कोयत्याने वार करण्यात आले. अधिक तपास उपनिरीक्षक शेख करीत आहेत.