नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार हे व्हेंटिलेटरवर आहे. त्यामुळे हे सरकार फेब्रुवारी महिनाही पाहणार नाही, असा पुनरुच्चार शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज येथे केला आहे. पक्षबांधणी आणि पडझड रोखण्यासाठी तसेच, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पुढील महिन्यात होणाऱ्या जाहीर सभेच्यानिमित्ताने ते नाशिकला आले आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
संजय राऊत म्हणाले की, नेहमीप्रमाणे नाशिकला आलो आहे. उद्धव ठाकरे यांच्यासोबत नागपूरला होतो. राज्य सरकारचा गोंधळ जवळून पाहता आला आहे. हे सरकार अस्तित्वातच नाही. मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराची प्रकरण रोज बाहेर येत आहेत. मात्र सरकार पाण्यात बसलेल्या म्हाशीसारखं जणू काही घडलच नाही असं भासवत आहे. आणि विरोधी पक्षच दोषी असल्याचं दाखवत आहे. याआधी असं होत नव्हतं, असा दावाही त्यांनी केला.
राऊत पुढे म्हणाले की, मुख्यमंत्र्यांसह ६ मंत्र्यांचे भ्रष्टाचाराचे पुरावे येवून देखील सरकार ढिम्म बसलंय. राज्यात परिवर्तनाचे वारे आहेत. या सरकारमध्ये २ गट पडले आहेत. हे सरकार फेब्रुवारी महिनाही बघणार नाही. न्याय व्यवस्थेवर दबाव आणला नाही, तर सरकार हे पडणार. सध्या हे सरकार व्हेंटिलेटरवर असल्याचा भक्कम दावा राऊत यांनी यावेळी केला.
क्रिकेटच्या मैदानात बॅटिंग
राऊत यांनी GPL क्रिकेट स्पर्धांचे उद्घाटन केले. धावपट्टीवर येऊन राऊत यांनी यावेळी बॅटिंग केली. क्रिकेटच्या पीचवर राऊतांनी शाब्दिकही फटकेबाजी केली. यावेळी राऊत म्हणाले की, माझा क्रिकेटचा तसा संबंध नाही. हिच पोरं उद्या भगवा खांद्यावर घेणार आहे. त्यामुळे मला मैदानात यावे लागते. खिलाडू वृत्ती राजकारणातून कमी होत चालली आहे. बाळासाहेबांना राजकारणात अशीच खिलाडू वृत्ती अपेक्षित होती. मैदानात चांगली फटकेबाजी करत जा असे ते नेहमी म्हणायचे. मला तुम्ही कायम धुलाई करायला बोलावतात. हे छोटे मैदान आहे, पुढे आपल्याला मोठ्या मैदानात लढायचं आहे, असे संदेशही राऊत यांनी यावेळी शिवसैनिकांना दिला.
State Government is on Ventilator says Sanjay Raut in Nashik
Shivsena Politics