नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दिल्लीमध्ये गुन्हेगारीच्या क्षेत्रात काहीही होऊ शकतं, हे आता निश्चित झालं आहे. कोण कुठल्या थराला जाईल, याचा काही नेम राहिलेला नाही. केवळ देशाचीच नाही तर गुन्हेगारीची राजधानी म्हणूनही दिल्लीची ओळख झालेली आहे. अलीकडेच थर्टी फर्स्टलाही एका तरुणीचा इतका विचित्र पद्धतीने मृत्यू झाला की, ऐकल्यावर अंगारे शहारे उठावे.
दिल्लीतील गुन्हेगारीने चित्रपटसृष्टीला खूप खाद्य दिले. अनेक वेबसिरीज, चित्रपट दिल्लीतील घटनांवर आधारीत आहेत. त्यामागचं कारण भावनिक गुंतागुंत आणि गुन्हेगारांच्या क्रौर्यात दडलेलं आहे. अलीकडेच थर्टी फर्स्टला एका तरुणीला १२ किलोमीटर फरफटत नेऊन तिचा खून करण्यात आला. दुसऱ्या दिवशी म्हणजे नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी ही भयंकर घटना जगापुढे आली. दिल्लीतील कंझावाला भागात ही घटना घडली. अंजली नावाची तरुणी ३१ डिसेंबरला पार्टीसाठी घरातून बाहेर पडली आणि त्यानंतर ती घरीच आली नाही. दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत कुटुंबातील लोकांनी वाट बघितली. पण नंतर त्यांना वाईट बातमी ऐकायला मिळाली.
मैत्रीणीसोबत मारामारी
अंजली आणि तिची मैत्रीण पार्टीसाठी गेले होते. त्यावेळी काही मित्रही त्यांच्यासोबत होते. काहीवेळाने दोघींमध्ये जोरदार भांडण झालं. मित्रांनी त्यांचं भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला. पण त्या एकमेकींना मारायलाही लागल्या होत्या. पुन्हा सगळे मित्र मध्ये पडले आणि त्यांनी दोघींना वेगळं केलं. त्यानंतर काहीवेळा दोघीही पार्टीच्या ठिकाणाहून निघून गेल्या.
घरी येतानाच मृत्यू
अंजली घरी जात असताना तिला एका कारने १२ किलोमीटर फरफटत नेलं. यात तिचे कपडे पूर्णपणे फाटले आणि तिचा मृत्यू झाला. मुळात अंजली आणि निधी एकाच गाडीने गेले होते की वेगवेगळ्या गेल्या होत्या याबाबत अद्याप काहीही कळू शकलेले नाही. कुटुंबियांनी निधीवर संशय घेतला आहे. आणि त्यांनी तिच्या चौकशीची मागणीही केली आहे.
चालक तर घरी होता
मुळात ज्या गाडीने अंजलीला फरफटत नेले त्याच्या चालकाचा शोध घेऊन पोलिसांनी त्याला अटक केली. पण तपास केला असताना पोलिसांना असे लक्षात आले की, घटनेच्या वेळी चालक त्याच्या घरी होता. त्याच्या फोनचे लोकेशन अपघाताच्या वेळी वेगळ्याच ठिकाणाचे होते. त्यामुळे पोलिसांनी घातपाताची शंका व्यक्त केली आहे.
New Delhi Kanjhawala Young Girl Death Case