नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – केंद्रीय कर्मचाऱ्यांना सरकारकडून लवकरच आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. डीएमध्ये वाढ करण्याची मागणी पूर्ण झाल्यानंतर आता फिटमेंट फॅक्टरमध्येही वाढ होण्याची शक्यता आहे. गेल्या काही काळापासून यामध्ये वाढ करण्याची मागणी कर्मचाऱ्यांकडून केली जात होती.
केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचा पगार निश्चित विविध बाबींची महत्वाची भूमिका असते. यापैकीच एक असलेल्या फिटमेंट फॅक्टरमध्ये वाढ झाली तर पगारात मोठी वाढ होते. केंद्रीय कर्मचाऱ्यांकडून याच फिटमेंट फॅक्टरमध्ये ३.६८ टक्क्यांच्या वाढीची मागणी केली जात आहे. सध्या फिटमेंट फॅक्टर २.५७ टक्के इतका निश्चित आहे. मीडिया रिपोर्टनुसार यंदाच्या वर्षाच्या अखेरीस केंद्र सरकार फिटमेंटबाबत मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो. मात्र, केंद्र सरकारकडून अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. याआधी यंदाच्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला फिटमेंटमध्ये वाढ होण्याची आशा होती पण तसं झालं नव्हतं. पण आता महागाई भत्त्यात वाढीचं गिफ्ट कर्मचाऱ्यांना मिळालं आहे आणि आता फिटमेंटमधील वाढीची आशा अधिक वाढली आहे.
फिटमेंट फॅक्टरचे पगारात असलेले महत्व
केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या फिटमेंट फॅक्टरमध्ये वाढ झाली तर सरकारकडून डीएमधील वाढीनंतर हे एक आणखी मोठं गिफ्ट ठरू शकेल. सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांचा पगार भत्त्यासोबतच त्यांच्या बेसिक सॅलरी आणि फिटमेंट फॅक्टरवर आधारित निश्चित केला जातो. त्यामुळे फिटमेंट फॅक्टरमध्ये वाढ झाली की पगारात हमखास वाढ होणार हे निश्चित आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांना सध्या २.५७ टक्क्यांच्या हिशोबाने फिटमेंट फॅक्टर मिळत आहे. या आधारावर किमान बेसिक सॅलरी १८ हजार रुपये इतकी आहे.
आता कर्मचाऱ्यांच्या मागणीनुसार यात वाढ होऊन फिटमेंट फॅक्टर ३.६८ टक्के इतका झाला तर कर्मचाऱ्याला मिळणारा किमान पगार २६ हजार रुपये इतका होईल. सध्या मिळणारा फिटमेंट फॅक्टरच्या आधारावर पगाराची विभागणी केली तर ज्याचा पगार १८ हजार रुपये आहे. त्याला इतर भत्ते वगळून १८,००० x २.५७= ४६,२६० रुपये मिळतात. जर फिटमेंटमध्ये वाढ होऊन तो ३.६८ टक्के इतका झाला. तर त्याच कर्मचाऱ्याचा पगार इतर भत्ते वगळून २६,००० x ३.६८ = ९५,६८० रुपये इतका होऊ शकतो. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे लक्ष या वाढीकडे लागले आहे.
Union Government Employee Good News Salary