नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – काठे गल्लीत राहाणा-या एका तरुणीच्या दुचाकी गाडीच्या डिक्कीत गावठी कट्टा मिळाल्यामुळे पोलिसांनी या तरुणीला ताब्यात घेतले असून तीची चौकशी सुरु केली आहे. रविवारी दुचाकीचे थकीत कर्ज वसुलीसाठी गेलेल्या फायनान्स कंपनीच्या कर्मचा-याला तरुणीच्या गाडीच्या डिक्कीत गावठी कट्टा दिसल्यानंतर त्यांनी ही माहिती पोलिसांनी दिली. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
काठे गल्ली येथे एका अपार्टमेंटमध्ये ही २५ वर्षीय तरुणी राहते. तीने दुचाकी विकत घेतली त्यासाठी कर्ज घेतले. हे कर्ज थकल्याने फायनान्स कंपनीचे कर्मचारी काठे गल्ली येथील तरुणीच्या फ्लॅटमध्ये गेले होते. त्यांनी थकीत कर्ज भरा, अथवा गाडी जमा करा असे सांगीतले. त्यानंतर या तरुणीने दुचाकीची डिक्की उघडली असता त्यात गावठी कट्टा दिसून आला. त्यानंतर या कर्मचा-यांनी ही माहिती ११२ पोलिस हेल्पलाइनला कळवली. त्यानंतर भद्रकाली पोलिस ठाण्याचे पोलिस घटनास्थळी आले व त्यांनी संशयित युवतीला ताब्यात घेऊन दुचाकी आणि गावठी कट्टा जप्त केला. या कट्ट्याबाबत तरुणीकडे पोलिसांनी चौकशी केल्यानंतर तीने विचारणा केल्यानंतर तिने घरात साफसफाई करताना बंदूक मिळून आल्याचे सांगितले. या बंदुकीचा परवाना तिच्याकडे नसल्याची माहितीही समोर आली आहे.