इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – शेअर बाजार हा एक प्रकारे जुगार मानला जात असला तरी त्यामध्ये लाखो नागरिक हे गुंतवणूक करताना दिसतात. विशेष म्हणजे ही गुंतवणूक हजार रुपयांपासून ते करोडो रुपयांपर्यंत असू शकते. शेअर बाजारांमध्ये काहीवेळा फायदा होत असला, तरी अनेक वेळा नुकसान देखील होते. आणि हे नुकसान प्रचंड मोठ्या प्रमाणात असते, सध्या जगातील श्रीमंत व्यक्तींच्या शेअर बाबत देखील सर्वत्र चर्चा सुरू आहे.
कोणते संकट कुणाचे काय नुकसान करेल, हे सांगता येत नाही. गेल्या दोन वर्षापासून कोरोनाने जगभरातील सर्वच नागरिकांचे नुकसान केले, गेल्या महिन्यात ओमिकॉन या नव्या प्रकारातील विषाणूने जगभरातील सर्वात श्रीमंत अशा व्यक्तींचे देखील नुकसान झाले होते, परंतु आता पुन्हा एकदा नव्या वर्षात जानेवारी महिन्याच्या शेवटच्या टप्प्यात जगातील अब्जाधीश असलेल्या व्यक्तींचे प्रचंड नुकसान झाले आहे काय आहे नेमके यामागील कारण?…
सध्या जगभरातील शेअर बाजार हादरले आहेत. गेल्या आठवड्यात शेअर बाजारातील घसरणीचा परिणाम जगातील श्रीमंतांच्या संपत्तीवर दिसून आला. ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकानुसार, टॉप-5 टेक्नॉलॉजी मधील अब्जाधीशांच्या वैयक्तिक संपत्तीत गेल्या सात दिवसांत सुमारे 4.99 लाख कोटी रुपयांची घट झाली आहे. इलेक्ट्रिक कार निर्माता कंपनी टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलॉन मस्क यांच्या संपत्तीत 1.86 लाख कोटी सर्वात मोठी घट झाली आहे. सर्वाधिक संपत्ती गमावलेले सर्व श्रीमंत लोक अमेरिकेतील आहेत.
महागाईच्या भीतीने बाजार स्तब्ध, सेन्सेक्स 1545 अंकांनी खाली, गुंतवणूकदारांचे 20 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले. गेल्या आठवड्यात, यूएस मध्यवर्ती बँकेने सांगितले की, अनियंत्रित चलनवाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मार्चपासून व्याजदर वाढविण्याचा विचार करत आहे. मध्यवर्ती बँकेचे हे विधान गुंतवणूकदारांना पसंत पडलेले नाही. त्यामुळे अमेरिकन शेअर बाजार घसरत आहेत. याशिवाय युक्रेनबाबत रशिया आणि इतर देशांमध्ये सुरू असलेल्या तणावाचा परिणामही शेअर बाजारांवर दिसून येत आहे.
ब्लूमबर्ग अब्जाधीशांच्या निर्देशांकात 10 सर्वात श्रीमंत अब्जाधीशांमध्ये अमेरिकेचे वर्चस्व आहे. तसेच 10 पैकी 9 अब्जाधीश अमेरिकेतील आहेत. टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क 240 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह पहिल्या क्रमांकावर आहेत. अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस169 अब्ज डॉलर्स संपत्तीसह दुसऱ्या आणि फ्रेंच लक्झरी वस्तूची कंपनी ( LMVH ) चे CEO बर्नार्ड अर्नॉल्ट 158 अब्ज डॉलर्स संपत्तीसह दुसऱ्या स्थानावर आहेत.
यांनी गमावली संपत्ती
– एलोन मस्क, (सीईओ टेस्ला) 1.86 लाख कोटी रुपये.
– जेफ बेझोस, (अॅमेझॉनचे संस्थापक) 1.49 लाख कोटी रुपये.
– मार्क झुकेरबर्ग (फेसबुकचे संस्थापक) 77 हजार कोटी रुपये.
– लॅरी पेज, (गुगलचे सहसंस्थापक) 56 हजार कोटी रूपये .
– बिल गेट्स, (मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक) 32 हजार कोटी रुपये .