मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणे पेपर सोडवावा आणि कॉपी करण्याचा प्रयत्न करू नये, याची जबाबदारी शिक्षकांवर असते. पण विद्येच्या माहेरघरी अर्थात पुण्यातील दौंड तालुक्यात शिक्षकच विद्यार्थ्यांना कॉपी पुरविण्याचे काम करीत होते. त्यामुळे या शाळेतील नऊ शिक्षकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
बारावीची परीक्षा सुरू झाली की कॉपीची अनेक प्रकरणे पुढे येतात. पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत या घटना कानावर पडत असतात. पण यात बहुतांश प्रमाणात विद्यार्थीच आरोपी असतात. पण कधीकधी शिक्षकही यामध्ये सहभागी असतात. अशीच घटना दौंड तालुक्यातील केडगाव येथील जवाहर माध्यमिक विद्यालयात घडली आहे. या शाळेत बारावीची परीक्षा सुरू असताना अचानक भरारी पथकाने धाड टाकली. वर्गखोल्यांमध्ये गेल्यानंतर विद्यार्थी सामूहिक कॉपी करीत असल्याचे निदर्शनास आले. विशेष म्हणजे विद्यार्थी हा संपूर्ण प्रकार शिक्षकांच्या देखरेखीत करीत होते. भरारी पथकाला ते स्पष्टपणे जाणवले. या प्रकरणाचा प्राथमिक तपास केल्यानंतर भरारी पथकात सामील प्राथमिक शिक्षण विभागाचे विस्तार अधिकारी किसन भुजबळ यांनी नऊ शिक्षकांविरुद्ध तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी शिक्षकांवर गुन्हे दाखल करीत पुढील कारवाई सुरू केली आहे. परभणी येथे याआधी सहा शिक्षक इंग्रजीचा पेपर शाळेच्या मागे बसून सोडवताना आढळले होते. हे सर्व शिक्षक विद्यार्थ्यांसाठी कॉपी तयार करत होते. त्यांच्यावरही कारवाई झाली होती.
हे कसले कॉपीमुक्त अभियान?
शिक्षण मंडळ संपूर्ण राज्यात शिस्तबद्ध परीक्षा व्हावी, यासाठी कॉपीमुक्त अभियान राबवत आहे. त्यासाठी विविध उपाययोजना राबवीत आहेत. भरारी पथकांच्या फेऱ्या तर सुरू असतातच, शिवाय पोलीसांचा ताफाही परीक्षा केंद्रांबाहेर उभा ठेवण्यात आला आहे. तरीही एखाद्या शाळेतील नऊ शिक्षक विद्यार्थ्यांना कॉपी करण्यासाठी मदत करतात, ही आश्चर्याची बाब आहे. त्यामुळे आता हे कसले कॉपीमुक्त अभियान, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
केंद्र संचालकही सामील
विद्यार्थ्यांना कॉपी पुरवल्याच्या प्रकरणात चक्क परीक्षा केंद्र संचालक जालिंदर काटे आणि उपकेंद्र संचालक रावसाहेब भामरे यांचाही समावेश आहे. यांच्यासह प्रकाश कुचेकर, दिवेकर विकास, गोरगल शाम, कविता काशीद, जयश्री गवळी, सुरेखा होन, अभय सोननवर या शिक्षकांवर महाराष्ट्र गैरव्यवहार प्रतिबंधक कायदा सन १९८२, महाराष्ट्र विद्यापीठ बोर्ड आणि इतर निर्दिष्ट परीक्षा कायदा १९८२च्या कलम आठप्रमाणे यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.