विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या सध्याच्या मंत्रिमंडळातील तब्बल डझनभर मंत्र्यांना नारळ दिला आहे. त्यात पर्यावरण, माहिती, प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर, माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद, आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन, रसायन मंत्री सदानंद गौडा, शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक, पर्यावरण राज्यमंत्री बाबुल सुप्रियो, उद्योग मंत्री प्रताप सारंगी, देबोश्री चौधरी, संतोष गंगवार, रतनलाल कटारीया यांचा समावेश आहे. यापूर्वी मंत्री रावसाहेब दानवे यांच्या राजीनाम्याचेही वृत्त आले होते. मात्र, १२ जणांच्या यादीत त्यांचा समावेश नसल्याने त्यांचा मोदींचा खो मिळाला आहे.
सायंकाळी सहा वाजता हा शपथविधी सोहळा होणार आहे. तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा हे संभाव्य मंत्र्यांशी चर्चा केली आहे. त्यानंतर विद्यमान मंत्र्याच्या राजीनाम्याचे सत्र सुरु झाले. यात प्रकाश जावडेकर, रविशंकर प्रसाद, आरोग्यमंत्री डॅा.हर्षवर्धन यांचे मोठे नाव आहे. या नव्या मंत्रिमंडळात ओबीसीचे २७, एसी १२ , एसटी ८, अल्पसंख्याक ५ , महिला ११ असणार असून त्यात वकील १३, डॅाक्टर ६, इजिनिअर ५, ब्यूरोक्रेट ७ असणार असल्याचे बोलले जात आहे.
या चौघांना महाराष्ट्रातून संधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील मंत्रिमंडळ विस्तारात कुणाला संधी मिळणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. महाराष्ट्रातून कुणाचा समावेश होतो, याची उत्सुकता अनेकांना आहे. त्यात जवळपास दोन नावांची निश्चिती झाली होती. यामध्ये महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे आणि भिवंडीचे खासदार कपिल पाटील यांचा समावेश निश्चित मानला जात आहे. पण, आता दिंडोरी लोकसभा मतदार संघाचे डॅा. भारती पवार व डॅा. भागवत कराड यांचे नावे निश्चित झाले आहे. या चारही खासदारांनी पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली.