नाशिक – काही खाजगी शाळांनी फी वाढ केल्यामुळे पालकांनी याविरुद्ध आवाज उठवला आहे. शहरातील तिडके कॉलनी आणि राणे नगर परिसरात असलेल्या सेंट फ्रान्सिस शाळेच्या फी वाढीसंदर्भात येत्या २७ ऑक्टोबर रोजी मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली आहे. राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे.
सप्टेंबर महिन्यापासून पालकांनी या विरोधात तक्रार करण्यास सुरुवात केली. त्यानंतर शिक्षण उपसंचालकांनी शाळांमधील पालकांच्या तक्रारींकडे लक्ष देण्यासाठी विभाग अधिकाऱ्यांच्या दोन समित्या स्थापन केल्या. विभागाने नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांना शाळांचे कागदपत्र तपासण्याचे निर्देश देण्यात आले. यात मुंबई येथील सेंट जोसेफ शाळेचा देखील समावेश आहे.
सुमारे ३५ शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी फी वाढीचा मुद्दा उपस्थित केला आहे. राज्य सरकारने याकडे गांभीर्याने पहावे व संबंधित प्रकरणावर त्वरित कार्यवाही करावी, असे मत फोरम फॉर फेयरनेस इन एज्युकेशन (एफएफई) या स्वयंसेवी संस्थेचे अध्यक्ष जयंत जैन यांनी केले आहे. सदर विषयावर चर्चा करण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले असून योग्य प्रक्रियेद्वारे पालकांना न्याय देण्यात येईल, असे मत विभागीय अधिकाऱ्यांनी दिले आहे.