नाशिक – नाशिकच्या नागरिकांच्या आरोग्यहीताला प्राधान्य देत गर्दी टाळण्यासाठी राज्यशासनाच्या ब्रेक द चेन अभियानाला नाशिक सराफ असोसिएशनने पाठींबा दिला आहे. राज्यांत अनेक महानगरांमध्ये कोवीड रूग्ण वाढल्याने आरोग्य यंत्रणा, पोलिस प्रशासन व स्थानिक प्रशासनावर मोठा ताण वाढल्याचे चित्र दिसून आले आहे. नाशिक शहरालाही याच परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. शहरासह जिल्ह्यातील ही परिस्थिती पाहता नासिक सराफ असोसिएशनने शहरात वाढत चाललेली कोवीड रूग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनास पूर्ण सहकार्य करणार असल्याची भूमिका घेतली आहे.
जिवनावश्यक वस्तू वगळता सर्व प्रकारची दुकाने उघडल्याने व रस्त्यांवर पुन्हा बाजार भरू लागल्यावर ग्राहक गर्दी करतील आणि पुन्हा रूग्णसंख्या वाढण्याची भिती असल्याने “आधी ग्राहकांचे आरोग्य महत्वाचे” हा उदात्त हेतू नजरेसमोर ठेवून नाशिक सराफ असोसिएशन शासनाचा आदेश पाळणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे नाशिकच्या सराफ संघटनेने घेतलेल्या भूमिकेचे स्वागत करण्यात आले आहे.
गेल्या अठवड्यापासून नाशिक शहरासह जिल्हयात सर्वत्र कोवीड रूग्णसंख्या वाढत चालली आहे. त्यात सर्वच वयोगटाला कोवीडच्या प्रादुर्भावाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण निर्माण झाला असून अशा परिस्थितीत शासनाच्या निर्णयाविरोधात जाऊन सर्वच प्रकारची दुकाने- व्यवसाय सुरू करण्याचा अट्टहास ग्राहकांसह व्यावसायीकांच्याही जिवावर बेतण्याचा धोका निर्माण होणार आहे.
गेल्या वर्षभरापासून कोवीडकाळातून जातांना व्यावसायीकांना आर्थिक ताळमेळ बसवीणे कठीण होऊन बसले आहे. अनेकांच्या हाताला काम नाही, शेतीमालाला पाहिजे तसा दाम नाही, कोवीड काळात अनेकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या. याचा एकत्रीत परिणाम जाणवत असून बाजारात येणाऱ्या ग्राहकांकडेच पैश्यांची मोठी चणचण दिसून येत असल्याने सध्या व्यावसायीक उलाढाल मंदावल्याचे चित्र आहे. एकीकडे हे आर्थिक संकट ओढावले असले तरी दुसरीकडे कोवीडचा अजगरी विळखा पुन्हा एकदा घट्ट झाल्याने नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत आस्थापने बंद ठेवून गर्दी आटोक्यात आल्यास ग्राहकांचे आरोग्यहीत जपता येईल व ब्रेक द चेन हे राज्यशासनाच्या महत्वकांक्षी अभियानालाही पाठबळ मिळेल. राज्यशासनाच्या या अभियानास सर्व व्यावसायीक संघटनांनी व नागरीकांनी पूर्ण सहकार्य केल्यास नक्कीच कोवीडच्या संकटातून आपण बाहेर येवू व पुन्हा व्यवसायास सूरवात करू असा विश्वास नाशिक सराफ असोसिएशनचे अध्यक्ष गिरीश नवसे व सेक्रेटरी किशोर वडनेरे यांनी व्यक्त केला आहे.