जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली माहिती
नाशिक – कोरोनाकाळात अनेक विभागांची कामे खोळंबली असली तरी शैक्षणिक आणि कार्यालयीन कामकाजासाठी महत्त्वाची असलेले विविध दाखले वाटपात जिल्हा प्रशासनाने तत्परता दाखवत फेब्रुवारी ते जुलै या कालावधीत तब्बल १ लाख १३ हजार २२९ दाखले वितरीत केली आहेत. तर अवघ्या १३ हजार ८८२ दाखल्यांची अर्ज निकाली काढणे बाकी असून त्यांच्यातील त्रुटी दूर करुन प्रलंबित दाखल्यांचे जिल्ह्यात वितरण केले जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली.
दाखले वितरणाबाबत माहिती देत असतांना जिल्हाधिकारी मांढरे म्हणाले, कोरोनामुळे ओढावलेल्या लॉकडाउनमध्ये अनेक विभागातील कामकाज प्रभावित झाले. खासगी कार्यालयात वर्क फ्रॉम सुरू झाले. सरकारी कार्यालयातही केवळ पाच टक्के उपस्थितीत कामकाज करण्यात आले. मात्र अशा परिस्थितीतही विविध दाखले वाटपाच्या कामकाजात गतिमानता आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. १ लाख २८ हजार प्रकरणामंध्ये अर्ज नाकरण्याचे प्रमाण फार कमी असून फक्त ९२६ अर्ज त्रुटी असल्यामुळे नाकारण्यात आले असल्याचेही मांढरे यानी सांगितले.
सर्वात जास्त उत्पन्न दाखल्याचे वितरण
नाशिक जिल्ह्यात सर्वात जास्त उत्पन्न दाखल्याचे वितरण झाले आहे. ७० हजार ८२९ अर्जांपैकी ६४ हजार ९७९ दाखल्यांचे वितरण करण्यात आले. त्यामध्ये ३१७अर्ज नाकारण्यात आले असून ५ हजार ५३३ दाखले प्रलंबित असून त्यातील त्रुटी दूर करुन प्रलंबित प्रकरणेही लवकर निकाली काढली जाणार असल्याचे मांढरे यांनी सांगितले.