नवी दिल्ली – चीन आणि भारत यांच्यातील सध्या वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे दोन दिवसांच्या लडाख दौऱ्यावर पोहचले आहेत. चीनकडून सीमारेषा बदलण्याच्या आगळीकीसंदर्भात सेनादलाच्या अधिकाऱ्यांकडून ते आढावा घेणार आहेत. २९ आणि ३० ऑगस्ट रोजी चिनी सैन्यानं लडाखच्या पेनगांग भागात प्रत्यक्ष सीमारेषा बदलण्याचा प्रयत्न केला होता. यानंतर भारताने या भागात बंदोबस्तात वाढ केली आहे.
हवाई दल प्रमुखांचाही दौरा
हवाईदल प्रमुख एअर चीफ मार्शल, आर के एस भदौरीया यांनी पूर्व हवाई विभागातील सीमेवरच्या हवाईतळांना भेट दिली. पूर्व हवाई विभागात हवाई दलांचे आगमन झाल्यावर, या विभागातील प्रमुख अधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. तसेच, त्यांच्या विभागाच्या अखत्यारीतील तुकड्यांची सद्यस्थिती आणि ऑपरेशनविषयक सज्जता, याविषयी माहिती दिली. हवाईदलप्रमुखांनी यावेळी, या तुकड्यांमधील हवाईयोद्ध्यांचीही भेट घेतली. प्रत्येक भूमिका आणि कर्तव्ये कार्यक्षमतेने पार पाडण्यासाठी या कर्मचाऱ्यांचे निश्चित ध्येय घेऊन प्रयत्न सुरु असल्याबद्दल हवाई दल प्रमुखांनी त्यांचे स्वागत केले. आणि भविष्यातही अशाच चिकाटीने कर्तव्य पार पडत राहावे, असे आवाहन केले.
दिवसभरातील घडामोडी अशा
– पाकिस्तानला सडेतोड उत्तर देऊ – सीडीएस बिपीन रावत
– भारताने ११८ चीनी अॅप्सवर बंदी घातल्याने चीनचा तीव्र आक्षेप
– पूर्व लडाखमध्ये लष्करी बळ वाढविण्याची चिन्हे