आपण घाबरू नका, पण जागरूक रहा !
नाशिकः कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन लोकांमध्ये भितीपेक्षा सुरक्षित आणि सलोख्याचे वातावरण निर्माण व्हावा, या उद्देशाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जनकल्याण समितीतर्फे शहर परिसरातील विविध चौकांच्या तसेच सिग्नलच्या जवळपास ५० ठिकाणी फलक, ध्वनीक्षेपकाद्वारे कोरोना सामाजिक जनजागृती अभियान राबविण्यात आले.
लॉकडाऊनमध्ये घ्यावयाच्या काळजीबाबत सरकार व प्रशासनाने काही नियम घालून दिले आहे. हे नियम आरोग्य व पोलिस कर्मचारी जनतेपर्यत पोहचवून अमंलबजावणी करत आहे. पण पाच महिने झाले तरी हे सुरुच असल्याने लोकांमध्ये नियम पालनाबाबत निष्काळजीपणा दिसून येत आहे. याचा परिणाम पोलिस व आरोग्य यंत्रणेचा ताण वाढण्यावर होत आहे. काल झालेल्या या अनोख्या उपक्रमांतर्गत शहरासह सातपूर अशोक नगर पोलीस चौकी-अंबिका चौक, सातपूर भाजी मार्केट, जेहान सर्कल, पारीजात नगर सिग्नल व आनंदवल्ली पाईपलाईन रोड सिग्नल यासारख्या ठिकाणी हा उपक्रम राबविण्यात आला.
निष्काळजीपणा दूर करण्याचा प्रयत्न
लोकांच्या निष्काळजीपणा दूर करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीने सामाजिक संदेशाचा एक छोटासा प्रयत्न केला. यात महाविद्यालयीन तरुणांपासून तर प्रौढ संघस्वयंसेवकांनी भाग घेतला. हातात घाबरू नका, पण जागरूक रहा, कोरोना विषाणू संसर्ग उपचाराबाबत सकारात्मक रहा, नियमितपणे साबण व पाणी वापरून आपले हात स्वच्छ धुवा, गर्दीच्या ठिकाणी विनाकारण जाऊ नका, योगाभ्यास जीवनाचा भाग बनवा, मास्कचा वापर करा, जीवन वाचवा यासारख्या आशयाचे फलक घेत चौकाचौकात,सिग्नलवर जनजागृती केली.
भाजीमंडईतही जनजागृती
भाजीमंडडईच्या ठिकाणी ध्वनीक्षेपकांवरून लोकांना; ट्रीपल सीट जाऊ नका, एकमेकांना खेटून भाजी घेऊ नका, तीन फूट अंतर ठेवा, भाजी-फळ विक्रेत्यांशी घासाघीस करु नका, मास्क नूसता तोंडावर न लावता नाकही झाका, स्वच्छता राखा आशा विवीध सूचना देऊन जनजागृती केली.
स्वयंसेवकांना मिळाले प्रोत्साहन
चौक,सिग्नलच्या ठिकाणी उभ्या असणाऱ्या स्वयंसेवकांच्या हातातील सूचनाचे वाचन करण्याबरोबरच पादचारी, मोटारसायकलस्वार या उपक्रमाबद्दल आभार व्यक्त करत होते. काहींनी थम्स अप,अंगठा दाखवत प्रोत्साहित केले. ज्याचे मास्क नाकाखाली, गळ्यात लटकलेले होते त्यांनी फलक वाचून आपणहुन ते पुन्हा घातले. एका चौकात तर एक हेल्मेट घातलेला मोटरसायकल स्वार स्वयंसेवकांजवळ आला आणि हेल्मेट काढून त्याने खिशातून रुमाल काढून मास्क सारखा बांधला व म्हणाला की मला वाटत होते आपण हेल्मेट घातले आहे मग मास्क कशाला ? पण तूम्ही जे पावसात ऊभे राहून जनजागृती करत आहात, त्यावरुन पटले की हेल्मेट घातले पाहिजे.