नाशिक – “मिशन झिरो नाशिक” या एकात्मिक कृती योजनेत आज (१३ ऑगस्ट) २१ व्या दिवशी १२२० नागरिकांनी अँटीजेन चाचण्या करून घेतल्या. त्यापैकी २२१ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आले. त्यामुळे गेल्या २१ दिवसात या अभियानामध्ये ३० हजार २८७ अँटिंजेन चाचण्या झाल्या असून त्याद्वारे ३ हजार ५५३ पॉझिटिव्ह रुग्ण हुडकून काढण्यात यश आले आहे.
महानगरपालिका, भारतीय जैन संघटना, वॉटर ग्रेस कंपनी व विविध स्वयंसेवी व्यक्ती, संघटना यांचे वतीने मिशन झिरो नाशिक हे अभियान सुरु करण्यात आले आहे. लक्षणे असलेल्या तसेच वयस्कर व इतर आजारी असलेल्या नेमक्या व्यक्तींची तपासणी होत असल्याने पॉझिटिव्ह रुग्णांना हुडकून काढण्यात यश येत आहे. पॉझिटिव्ह रुग्णांना लवकर शोधून काढणे, लगेच उपचार करणे, आयुर्वेदिक काढा देणे, समुपदेशन करणे, रुग्णांचा पाठपुरावा करणे व कुटुंबातील व संपर्कातील इतर सदस्यांचीही तपासणी करणे यामुळे सदरील रुग्ण लवकर बरे होऊन त्यांना शारिरीक व मानसिक बळ देण्यात येते. तसेच पुढील होणारे संक्रमणही थांबविण्यात मोठ्या प्रमाणावर यश येत आहे. रुग्ण गंभीर झाल्यानंतर रुग्णालयात येण्याचे प्रमाण झपाट्याने कमी झाले आहे.
२२ मोबाईल व्हॅन
मनपाच्या सहाही विभागातील विविध परिसरातून २२ मोबाईल डिस्पेन्सरी व्हॅन द्वारे तपासणी करून पॉझिटिव्ह रुग्ण शोधून काढण्यात, फिल्ड वरील आरोग्य कर्मचाऱ्यांना व कार्यकर्त्यांना यश आले आहे. मिशन झिरो नाशिक करिता २२५ च्यावर कर्मचारी व कार्यकर्त्यांची टीम कार्यरत आहे. त्याचबरोबर प्लाझमा डोनर्स जीवनदाता योजनेअंतर्गत कोरोनावर यशस्वी मात केलेल्या व्यक्ती आपल्या रक्तातील प्लाझ्मा दान देण्यासाठी पुढे येत असून संमती पत्रे भरून देत आहेत. कोरोना विरुद्धच्या लढाईत यशस्वी झालेल्या १८ ते ५५ वयोगटातील व इतर मोठे आजार नसलेल्या व्यक्तींच्या रक्तातील प्लाझ्मा इतर कोरोना बाधित रुग्णांना दिला जातो व त्यायोगे सदरील रुग्ण हि कोरोना विरुद्धच्या लढाईत यशस्वी होतात.प्लाझ्मा दान संमती पत्रे भरून देण्यासाठी कृपया ८६६९६६८८०७ या क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन भारतीय जैन संघटनेचे प्रकल्प प्रमुख नंदकिशोर साखला यांनी केले आहे.
सहकार्याचे आवाहन
नागरिकांनी न घाबरता पुढे येऊन मोफत रॅपिड अँटिंजेन टेस्ट चाचण्या करून घ्याव्यात. तसेच आवश्यकेनुसार मोफत आरटी पीसीआर चाचणी करिता समाज कल्याण वसतिगृह नासर्डी पुलाजवळ, नवीन बिटको रुग्णालय नाशिक रोड, पंजाबराव देशमुख वसतिगृह मेरी कंपाउंड येथे रुग्णांनी संपर्क करावा. शहरातील विविध धार्मिक संस्था, ज्ञाती संस्था, गणेशोत्सव मंडळे ह्यांनी पुढाकार घेऊन कोविड मुक्त नाशिक च्या अभियानाला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात येत आहे.
यांचा आहे सहभाग
मिशन झिरो नाशिक अभियानात महानगरपालिका, नगरसेवक, पोलिस आयुक्तालय, भारतीय जैन संघटना, सैफी ऍम्बुलन्स कॉर्पस, गुरुद्वारा नाशिकरोड, किशोर सूर्यवंशी इंटरनॅशनल स्कूल, एस के डी इंटरनॅशनल स्कूल, व्हिजन अकॅडमी, साधना फाऊंडेशन, मातोश्री ट्रॅव्हल्स, एस्पिलियर स्कूल, डॉक्टर्स, फार्मासिस्ट, लॅब टेक्नीसिएन, शिक्षक, स्थानिक सामाजिक व राजकीय कार्यकर्ते अश्या अनेक संस्था व व्यक्ती यांचे सहकार्य लाभत आहे.