नवी दिल्ली – रविवारी झालेल्या आॕनलाईन जागतिक बुद्धिबळ ऑलिंपियाड स्पर्धेच्या अंतिम फेरीचा सामना अतिशय रंगतदार अवस्थेत पोहोचलेला असतांनाच इंटरनेटच्या अनंत अडचणी आणि सर्व्हर डाऊन झाल्यामुळे अखेरीस जागतिक बुध्दीबळ संघटना फिडेने या स्पर्धेचे विजेतेपद भारत आणि रशियन संघाला संयुक्तपणे देण्याचा निर्णय जाहीर केला असुन त्यामुळे हे दोन्ही संघ आता सुवर्ण पदकाचे संयुक्त मानकरी ठरणार आहेत.
रशिया विरुध्द झालेल्या अंतिम सामन्यात पहील्या फेरी अखेर भारतीय बुध्दिबळपटूंनी ३-३ अशी बरोबरी साधली होती. दुसऱ्या फेरीचे सामने सुरु झाल्यावर अनुक्रमे पहील्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या बोर्डवर खेळणा-या निहाल सरीन, दिव्या देशमुख आणि कोनेरु हम्पी या भारतीय खेळाडूंना इंटरनेटच्या अडचणी आल्या. निर्धारीत वेळेचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे सहाजिकच भारतीय खेळाडूंच्या गुणांमध्ये कपात झाली व रशियन संघ विजेता म्हणून करण्यात आला होता. परंतु या निर्णयाविरुध्द भारतीय संघ व्यवस्थापनाने अपील केल्यानंतर परिस्थितीचा सारासार विचार करुन आयोजकांनी हा सामना अनिर्णीत घोषीत केला व दोन्ही संघाना संयुक्तपणे सुवर्णपदक जाहीर केले.
नाशिक शहरासाठी अभिमानाची बाब म्हणजे आॕनलाईन खेळल्या गेलेल्या या स्पर्धेच्या नेतृत्वपदाची सगळी सुत्र संघाचा कर्णधार ग्रॕडमास्टर विदीत गुजराथी याने नाशिकमधूनच हाती घेतली होती.
दर दोन वर्षांनी होणारी ही स्पर्धा यंदा कोरोना प्रादुर्भावामुळे ऑनलाइन पद्धतीने खेळविण्यात आली. विश्वनाथन आनंद, पी. हरीहरन आणि कोनेरू हम्पी यासारख्या दिग्गज बुद्धिबळपटूंचा समावेश असलेल्या भारतीय संघाचे नेतृत्व नाशिकच्या विदित गुजराथी या दमदार खेळाडूकडे प्रथमच सोपविण्यात आलेले होते. विदीत सध्या त्याच्या नाशिक मधील निवासस्थानी असून तेथूनच ही आॕनलाईन स्पर्धा खेळला. कुठल्या खेळाडूने कोणती फेरी खेळायची? कोणते डावपेच आखायचे ? यासारखे निर्णय विदीत या नामवंत खेळाडूंबरोबर आॕनलाईन चर्चा करुन घेत होता. गेले काही दिवस राञी उशिरापर्यन्त रोज संघ सहका-यांशी आॕनलाईन चर्चा करुन विदीतने संघाची रणनिती ठरवली, त्यावर मेहनत घेतली आणि अखेरीस १६३ देशांचा सहभाग असलेल्या या स्पर्धेत भारतीय संघाला ऐतिहासिक विजेतेपद मिळवून दिल्यामुळे विदीतवर अभिनंदनाचा वर्षाव होतो आहे.
याआधी २०१४ साली भारतीय संघाला या स्पर्धेत कास्य पदक प्राप्त झाले होते. ज्यावेळी ही स्पर्धा सुरू झाली त्यावेळी फिडे या जागतिक बुद्धिबळ संघटनेतर्फे प्रसिध्द करण्यात आलेल्या क्रमवारीत भारताचा ७ वा क्रमांक होता. परंतु आता ही स्पर्धा जिंकून नाशिककर असलेल्या विदीतच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने थेट सुवर्णपदक जिंकून इतिहास निर्माण केल्याने हा क्षण नाशिककरांसाठी निश्चितच अभिमानास्पद म्हणावा लागेल.
काल झालेल्या दुसऱ्या उंपात्य लढतीत राञी उशिरा रशियन संघाने अमेरिकन संघाचा पराभव करुन स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती तर भारतीय संघाने पोलंड संघाचा पराभव करुन या स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच अंतिम फेरीत प्रवेश मिळविला होता.