नवी दिल्ली – कोविड १९ मधून बऱ्या झालेल्या रुग्णांच्या प्लाझ्माचा उपयोग इतर रुग्णांवर उपचार म्हणून करणे, ही पद्धत अद्यापही प्राथमिक अवस्थेत आहे. ती प्रायोगिक तत्त्वावरच आहे, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे. या उपचार पद्धतीचे प्राथमिक निष्कर्ष अद्यापही अपुरेच असून निर्णायक ठरलेले नाहीत. त्यामुळे त्यावर आणखी कसून अभ्यास होणे आवश्यक आहे, असे संघटनेच्या मुख्य वैज्ञानिक डॉक्टर सौम्या स्वामिनाथन यांनी म्हटले आहे.
अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाने अमेरिकेत प्लाझ्मा उपचार पद्धतीचा नियमित उपयोग करायला काल मान्यता दिली, या पार्श्वभूमीवर त्या वार्ताहरांशी बोलत होत्या. प्लाझ्मा उपचार पद्धती ही कोरोनाच्या निर्मूलनासाठी ठोस अंतिम उपचार पद्धती म्हणून अजूनही मानता येणार नाही, असे त्या म्हणाल्या.
प्रत्येक व्यक्तीच्या शरीरात वेगवेगळ्या प्रकारच्या आणि वेगवेगळ्या स्तरावरच्या अॅन्टीबॉडीज म्हणजेच रोगप्रतिकारक द्रव्य तयार होत असल्यामुळे प्रत्येक व्यक्तीचा प्लाझ्मा हा स्वतंत्रपणेच गोळा केला पाहिजे आणि त्याचा उपयोग दात्याशी साधर्म्य राखणाऱ्या तशाच शरीरप्रकृतीच्या रुग्णांवर व्हायला हवा, असे त्यांनी सांगितले आहे.