शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही – डॉ.पी.एस.पवार
पिंपळगाव बसवंत – देश व समाजाच्या प्रगतीसाठी शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही. शिक्षणव्यवस्था कोलमडली तर देशातील व्यवस्था कोसळेल. बदलत्या परिस्थितीत शिक्षकांनी अंतर्मुख होऊन अधिक निष्ठेने ज्ञानदान करावे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक व माजी प्राचार्य डॉ. पी. एस. पवार यांनी आज येथे केले.
पिंपळगाव बसवंत येथील क. का. वाघ महाविद्यालयात समाजदिन कार्यक्रमात ते बोलत होते. मविप्रचे सभापती माणिकतात्या बोरस्ते अध्यक्षस्थानी होते. वरिष्ठ महाविद्यालय स्थानिक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विश्वासराव मोरे, व्यावसायिक समितीचे अध्यक्ष उल्हासराव मोरे, प्राचार्य डॉ.दिलीप शिंदे, दत्तोपंत आथरे, भीमराव मोरे, पुंडलिक निरगुडे, भास्कर रसाळ, भरत दाते, राजेंद्र निरगुडे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. प्राचार्य दिलीप शिंदे यांनी प्रास्तविक करताना महाविद्यालय तसेच संस्थेच्या प्रगतीचा चढता आलेख मांडला. तसेच कर्मवीरांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
प्रतिकूल परिस्थितीत सर्वस्व अर्पण करुन मविप्रची मुहूर्तमेढ रोवणा-या कर्मवीरांच्या स्मृती जागवत डॉ. पवार म्हणाले की महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज यांनी तळागाळात शिक्षणाचा प्रसार करुन समाजजागृतीचे महान कार्य केले. त्यांच्यापासून प्रेरणा घेत कर्मवीरांनी तळागाळापर्यंत शिक्षणाची गंगा नेली. तन-मन-धन अर्पण करुन एका वसतीगृहापासून त्यांनी हे पवित्र कार्य सुरु केले. गेल्या शंभर वर्षात संस्थेचा वटवृक्ष झाला आहे. पारंपारिक बरोबरच व्यावसायिक शिक्षणही संस्थेने सुरु केले आहे. समाजात चांगले नेतृत्व, कार्यकर्ते, आदर्श व्यक्ती घडाव्यात हा उद्देश ठेऊन संस्थेच्या घटनेची निर्मिती झाली आहे. आज शिक्षण क्षेत्रात आंतरविरोध वाढला आहे. अनुदानित-विनाअनुदानित तत्वामुळे शिक्षकांच्या प्रेरणेवर परिणाम झाला आहे. विद्यार्थीही भरकटला आहे. अशा परिस्थितीत शिक्षकांनी अंतर्मुख होऊन अधिक निष्ठेने अध्यापन करुन समाजाचा उत्कर्ष साधावा. नव्या शैक्षणिक धोरणामुळे दर्जेदार शिक्षण, जीवनकौशल्ये, नैतिक मूल्यांना चालना मिळेल अशी आशा आहे.
सभापती माणिकतात्या बोरस्ते म्हणाले की, कर्मवीरांचे योगदान अमूल्य आहे. त्यांच्या त्याग, कार्यापासून प्रेरणा घेत आपल्याला आदर्श पिढ्या व समाज घडवायचा आहे. शिक्षणाची दुरवस्था संपण्यासाठी शासनाने अनुदान वाढवून शिक्षकांना आधार दिला पाहिजे. प्रा. ज्ञानोबा ढगे यांनी सूत्रसंचालन केले. उपप्राचार्य डॉ.एस. एन. अहिरे यांनी आभार मानले. यावेळी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.