मुंबई – देश व राज्याच्या राजकारणात महत्त्वाचे स्थान असलेल्या पवार घराण्यात पुन्हा वाद निर्माण होतो की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे. बाबा शरद पवार आणि नातू पार्थ पवार यांच्यात जणू शाब्दिक खडाजंगी झाली आहे. त्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ यांचे काही विधान हे गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पेक्षा वेगळी असल्याचे दिसून येत आहे. श्रीराम मंदिर भूमीपूजनाला शरद पवार यांनी विरोध केला तर पार्थ यांनी त्याचे स्वागत केले. सुशांत सिंह राजपूत प्रकरणात महाविकास आघाडीची भूमिका सीबीआय चौकशीच्या विरोधात आहे. पण, या प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी, असे पार्थ यांनी म्हटले आहे. अखेर शरद पवार यांनी याची गंभीर दखल घेतली आहे. माझ्या नातवाच्या बोलण्याला मी कवडीची किंमत देत नाही. तो अपरिपक्व आहे, अशा शब्दात शरद पवार यांनी पार्थ यांना फटकारले आहे. तर, याची दखल घेत अजित पवार यांनी बुधवारी (१२ ऑगस्ट) रात्री तातडीने सिल्व्हर ओक या शरद पवार यांच्या निवासस्थानी पवार यांची भेट घेतली. यामुळे पवार कुटुंबात पुन्हा कलह सुरू झाला आहे का, असा तर्क लावला जात आहे.