मुंबई – नगर वन उद्यान योजना व शाळा रोपवाटिका योजना राज्यात विस्तारित स्वरूपात राबवण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने पूर्ण तयारी झाली असून २६ पैकी ११ महागरपालिकांचे नगर वन उद्यान प्रस्ताव आणि ४३ शाळांचे रोपवाटिका योजना प्रस्ताव केंद्रास सादर करण्यात आले आहेत. तशी माहिती वनमंत्री संजय राठोड यांनी दिली आहे.
देशातील सर्व राज्यांमधील वनमंत्री यांची आढावा बैठक दूरदृश्य प्रणालीद्वारे केंद्रीय पर्यावरण, वने व हवामान बदल मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या अध्यक्षतेखाली आज (१७ ऑगस्ट) झाली. त्यात राठोड सहभागी झाले. या योजनांसाठी केंद्राने राज्याला भरीव निधी द्यावा, अशी मागणी केंद्र सरकारकडे केली.
केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या निधी व्यतिरिक्त जिल्हा नियोजन निधी मधून प्रत्येक तालुक्यात एक याप्रमाणे शाळा रोपवाटिका योजना राबविण्याचा शासनाचा मानस आहे. केंद्र सरकारच्या २० कलमी कार्यक्रम अंतर्गत राज्यात मागील ४ वर्षात मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले आहे. या वर्षात वृक्ष लागवड सोबतच मागील वृक्ष लागवडीचे संगोपन व संवर्धन करण्याबाबत विशेष लक्ष देणार आहोत.
अशी आहे नगर वन उद्यान योजना
नगर वन उद्यान ही केंद्र शासनाच्या पर्यावरण व हवामान बदल मंत्रालयाची महत्वाकांक्षी योजना असून ही देशातील २०० शहरात राबवण्यात येणार आहे. त्यात राज्यातील २६ शहरांचा समावेश आहे. या योजनेसाठी २५ ते १०० हेक्टर क्षेत्रावर शहरात व शहरालगत वन क्षेत्रावर ही योजना राबविण्यात येते. या योजनेत केंद्र सरकारचा हिसा ८० टक्के असून राज्याचा हिस्सा २० टक्के राहणार आहे. एका शहर वन उद्यानसाठी कमाल २ कोटी रुपये एवढा निधी उपलब्ध करून दिला जाणार असून हा निधी प्रामुख्याने संरक्षक भिंत व वृक्षलागवड यासाठी वापरला जाणार आहे. या योजनेमुळे शहरातील नागरिकांमध्ये वन व जंगलाबाबत जागृती निर्माण होण्यास मदत होणार आहे.
अशी आहे शाळा रोपवाटिका योजना
शाळा रोपवाटिका योजना ही विद्यार्थी जीवनात वृक्ष लागवड, वृक्ष संगोपन व वृक्ष संरक्षण व संवर्धन याबाबत आवड निर्माण व्हावी म्हणून राबवली जाणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांची निवड करून त्यांच्यामार्फत एका शाळेत एक शाळा रोपवाटिका व एका रोपवाटिका मध्ये १ हजार रोपे निर्माण केली जाणार आहेत. या योजनेसाठी सरासरी ४० ते ५० हजार अनुदान एका शाळेस दिले जाणार आहे. या दोन्ही योजना राज्यात विस्तृत स्वरूपात राबवणार असल्याची माहितीही वनमंत्र्यांनी दिली