नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे “पारदर्शक करपद्धती – प्रामाणिकाचा सन्मान” यासाठीच्या मंचाचे उद्घाटन केले आहे. देशाच्या विकासात प्रामाणिक करदात्यांचे मोठे योगदान आहे. त्यांच्यासाठी हा मंच उपयुक्त ठरणार असल्याचा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला आहे.
कररचनेत अमुलाग्र बदल करण्यासाठी सरकार कटीबद्ध आहे. त्याची सुरुवात झाली आहे, असे मोदी यांनी स्पष्ट केले. नव्या प्रणालीत करदात्यांचा अधिकाधिक विचार करण्यात आला आहे. त्यांना दिलासा व सन्मान दोन्ही देण्यासाठीच हा मंच असल्याचे मोदी म्हणाले.
या आहेत सुविधा
“पारदर्शक करप्रणाली – प्रामाणिकतेचा सन्मान, या मंचाचा आरंभ २१ व्या शतकाच्या करप्रणालीच्या आवश्यकता पूर्ण करण्याच्या उद्देशाने करण्यात आला आहे. त्यांनी याविषयी तपशीलवार माहिती देताना सांगितले की, या प्लॅटफॉर्मवर फेसलेस मूल्यांकन, फेसलेस अपील आणि करदात्यांची सनद अशा मोठ्या सुधारणा करण्यात आल्या आहेत. फेसलेस मूल्यांकन आणि करदात्यांची सनद आजपासून उपलब्ध झाली आहे, तर फेसलेस अपीलची सुविधा देशभरातील नागरिकांना २५ सप्टेंबरपासून म्हणजे दीन दयाळ उपाध्याय यांच्या जयंतीपासून उपलब्ध असेल. नवीन फेसलेस मंचाच्या माध्यमातून करदात्यांचा विश्वास वाढवून, त्याला/तिला निर्भय बनवणे हा उद्देश आहे. गेल्या सहा वर्षांपासून सरकारचे लक्ष “बँकींग सुविधा नसलेल्यांना बँकींग, असुरक्षितांना सुरक्षितता प्रदान करणे, निधी नसलेल्यांना निधी उपलब्ध करुन देणे” यावर आहे. याच दिशेने “प्रामाणिकतेचा सन्मान करणे” हा मंच आहे.