नाशिक- गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना २०१५-१६ पासून राबविण्यात येत आहे. आतापर्यत योजनेंतर्गत केवळ खातेदार शेतकऱ्यांसाठी ही योजना लागू होती. मात्र या योजनेची व्याप्ती आता वाढविण्यात आली आहे. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना १० डिसेंबर २०१९ ते ९ डिसेंबर २०२० या कालावधीसाठी आहे. कार्यक्षेत्रातील एखाद्या शेतकऱ्यांचा अथवा त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचा मृत्यू झाल्यास अथवा अपंगत्व आल्यास त्याच्या वारसदारास या योजनेची माहिती मिळणे अपेक्षित आहे. या योजनेत खातेदार शेतकरी व त्यांच्या कुटुंबातील खातेदार म्हणून नोंद असलेला कोणताही एक सदस्य, अशा एकूण दोन जणांना योजनेचा लाभ दिला जाणार आहे. आता त्यांच्यासह त्यांचे कुटुंबातील कोणताही सदस्य (आई, वडिल, पती, पत्नी, मुलगा व अविवाहित मुलगी यापैकी कोणताही एक व्यक्ती ) असे दहा ते ७५ वयोगटातील एकूण दोन जणांना गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना राबविण्यास शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे
योजनेचे असे आहे स्वरूप
या योजनेतील बदलानुसार अपघातग्रस्त कुटुंबास आर्थिक लाभ देण्यासाठी सुमारे १.५२ कोटी शेतकरी व खातेदार म्हणून नोंद नसलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबातील एक सदस्यांचा देखील सदर विमा योजनेंतर्गत समावेश करून एकूण ३.०४ कोटी जणांना सदर योजनेंतर्गत प्रचलित योजना अधिक व्यापक व सर्व समावेशक करण्यात आलेली आहे. खातेदार शेतकऱ्यांसाठी शासन स्वतः विमा हप्ता भरते. अपघाती मृत्यु अथवा दोन अवयव निकामी झाल्यास दोन लाख व एक अवयव निकामी झाल्यास एक लाख रूपये नुकसान भरपाई देण्यात येते. अपघातात मृत्यु झाल्यावर स्थळ, पंचनामा, पोलिस ठाण्यातील फिर्यात, शवविच्छेदन अहवाल, वारस दाखला, वाहन चालवण्याचा परवाना, सात बारा, आठ अ, वारसदार अर्ज, आधारकार्ड, पासबबुक इत्यादी कागदपत्र कृषी विभागाच्या कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयांशी संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.