नाशिक – ग्रामीण भागात कोरोना जनजागृतीसाठी नाशिक जिल्हा परिषदेच्यावतीने आकर्षक चित्ररथ साकारण्यात आला आहे. हा रथ गावोगावी जाऊन विविध प्रकारचे जनप्रबोधन करणार आहे.
नाशिक जिल्हा आरोग्य विभाग यांच्या सहकार्याने सेव्ह द चिल्ड्रन सेंटर फोर यूथ डेव्हलपमेंट द्वारा कोरोना चित्ररथाचा शुभारंभ जिल्हा परिषद आवारात अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. सिन्नर तालुक्यात सेव्ह द चिल्ड्रन या संस्थेच्या सहयोगाने सभापती शोभा बरके, उपसभापती संग्राम कातकडे यांच्या मार्गदर्शनाने उपक्रमात सहभागी असलेल्या २० खेड्यांमध्ये या बसव्दारे जनजागृती करण्यात येणार आहे.
सेव्ह द चिल्ड्रन यांचेकडून कोरोनासाठी अन्न तसेच स्वच्छतेविषयक साहित्य, स्वच्छता उपकरणे, सिन्नर ग्रामीण रुग्णालयाला पीपीई किट, मास्क आदि स्वरुपात मदत करण्यात आली असून आता चित्ररथाव्दारे मास्क घालणे, साबणाने वारंवार हात धुणे, फिजिकल अंतर ठेवणे याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. यासाठी कोरोनाबाबत जनजागृतीपर संदेश असलेली बस तयार करण्यात आली आहे.
मान्यवरांनी हिरवा झेंडा दाखवून या मोहिमेचा शुभारंभ केला. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र शिंदे, सेव्ह द चिल्ड्रन संस्थेचे सहायक व्यवस्थापक धनंजय दिघे, प्रकल्प समन्वयक गणेश ताळे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद पिंगळे, इशाधिन शेळकंदे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपील आहेर, मनेाज पवार, दिलीप नवाळे, सिन्नर तालुका तहसीलदार राहुल कोताडे गटविकास अधिकारी डॉ लता गायकवाड, सिन्नर तालुका आरोग्य अधिकारी डॉ मोहन बच्छाव आदी यावेळी उपस्थित होते.