नाशिक – गेल्या मार्च महिन्यापासून बंद असलेले कोचिंग क्लासेस लवकरच सुरू होणार आहेत. यासंदर्भात राज्य सरकार गांभिर्याने विचार करीत असून येत्या काही दिवसातच त्यासंबंधीचा निर्णय अपेक्षित आहे.
कोरोना संकटात इंग्लिश मिडीअम व खाजगी शाळांमधील विद्यार्थ्यांना ऑनलाईन क्लासव्दारे ब-यापैकी शिक्षण मिळत आहे. परंतु सर्वसामान्य विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. राज्यातील अनेक सर्वसामान्य क्लासेस संचालक सुद्धा मोठ्या आर्थिक गर्तेत सापडले आहेत. या सर्व गोष्टींचा विचार करुन काही अटीशर्थी ठेवून राज्यातील कोचिंग क्लासेस व स्पर्धा परीक्षा केंद्रांना परवानगी मिळण्याची शक्यता आहे. यासंदर्भात राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नुकतीच चर्चा झाली असून लवकरच त्याबाबत निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी नागपूर येथे दिली आहे. या निर्णयामुळे क्लासेससंचालकांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे प्रोफेशनल टिचर्स असोसिएशन, नाशिकचे अध्यक्ष जयंत मुळे यांनी म्हटले आहे.
सद्यस्थितीत अनेक क्लास चालक विविध समस्यांना तोंड देत असून त्यांच्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा असल्याचे सचिव लोकेश पारख, खजिनदार अतुल आचलिया, उपाध्यक्ष मुकुंद रनाळकर, अण्णासाहेब नरुटे यांनी म्हटले आहे.
क्लास सुरू झाले तर विद्यार्थ्यांनाही त्याचा मोठा फायदा होणार असल्याचे विजय डोशी, विवेक भोर, कैलास खताळे, अरुण कुशारे, कार्याध्यक्ष शशिकांत तिडके यांनी म्हटले आहे.