नाशिक – मिशन झिरो अंतर्गत नावीन्यपूर्ण व आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून परदेशातून मागविलेल्या स्मार्ट हेल्मेट द्वारे एकाच वेळेस गर्दीच्या ठिकाणी मोठया प्रमाणावर शारीरिक तापमान तपासणीची मोहीम शनिवार पासून नाशिकमध्ये सुरु करण्यात आली. या स्मार्ट हेल्मेटव्दारे ५२०० च्या वर नागरिकांचे स्क्रीनिंग झाले. त्यात ३६ लोकांना संशयित म्हणून शोधण्यात आले. त्यात १५ रुग्ण पॉझिटिव्ह निघाले. या स्मार्ट हेल्मटेव्दारे मिनिटाला २०० जणांची स्क्रिनिंग होऊ शकते. दिवसाची याची क्षमता १ लाखापर्यंत आहे.
शनिवारी स्मार्ट हेल्मेट द्वारे दिंडोरी रोड वरील बाजार समितीच्या भाजीपाला यार्डात सुरु झाली. पण, त्यानंतर दुपारी २ नंतर पावसामुळे ती थांबवण्यात आली. स्मार्ट हेल्मेटला कॅमेऱ्यासह विविध सेन्सर बसविण्यात आलेले आहेत. कॅमेऱ्या द्वारे १८० डिग्री मध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे छायाचित्र टिपत थर्मल स्क्रिनिंग करत शरीराचे तापमान समजते व थर्मल इमेज हेल्मेट तंत्रज्ञाला दिसते. क्यूआर कोड आणि मोबाईल अँप्लिकेशनला सुद्धा जोडण्याची सुविधा उपलब्ध आहे. अतिशय सुलभतेने शरीराचे तापमान मोजता येत असल्याने एका मिनिटात २०० तर तासाला बारा हजार आणि दिवसाला एक लाख लोकांच्या थर्मल स्क्रिनिंगची क्षमता या स्मार्ट हेल्मेटमध्ये आहे. त्यामुळे कोरोना रूग्णांच्या शोध मोहिमेला याद्वारे बळ मिळणार आहे.
दि.०५/०९/२०२०