नाशिक – महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या उन्हाळी सत्राच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षेस आज प्रारंभ झाला आहे. विद्यापीठाच्या पदव्युत्तर वैद्यकीय विद्याशाखा वगळता पदव्युत्तर दंत, आयुर्वेदिक, युनानी, समचिकित्सा, नर्सिंग, भौतिकोपचार, व्यवसायोपचार, भाषा श्रवणदोष विज्ञान आदी विषयांच्या लेखी परीक्षा घेण्यात येत आहेत.
विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक यांनी सांगितले की, पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षेस विद्यार्थ्यांची उपस्थिती ९५ टक्के इतकी होती. परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी मास्क परीधान केले होते. राज्यातील ११५ परीक्षा केंद्रांत परीक्षा घेण्यात येत आहेत. परीक्षा केंद्रावर सोडियम हायपोक्लोराईट सोल्युशन व लिक्विड सॅनीटायझारचा वापर करण्यात आला. विद्यापीठाकडून सदरील परीक्षेची सीसीटीव्ही यंत्रणेद्वारे निरीक्षण करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
सदर परीक्षेसाठी सुमारे ७ हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्ज सादर केले आहेत. परीक्षा या २३ ऑगस्ट पर्यंत घेण्यात येणार आहेत. लेखी परीक्षा झाल्यावर प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात येतील. नियोजित वेळापत्रकानुसार २५ ते ३१ ऑगस्ट या कालावधीत पदव्युत्तर वैद्यकीय विद्याशाखांच्या विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा आयोजित केलेली आहे. त्यासाठीचे सर्व साहित्य परीक्षा केंद्रांवर पोहोचले आहे. या परीक्षेसाठी २ हजार २५० पेक्षा अधिक विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. परीक्षेविषयीचे कामकाज यशस्वी करण्यासाठी कुलगुरुंच्या मार्गदर्शनाखाली सहायक कुलसचिव महेंद्र कोठावदे, प्रमोद पाटील, संतोष कोकाटे, सचिन धेंडे, दिपक सांगळे, किशोर जोपळे यांनी परिश्रम घेतले आहेत.