नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- जिल्हा परिषदेत अनुकंपा तत्वावर गट ड मधून गट क संवर्गात १२ कर्मचारी यांना नियुक्ती आदेश देण्यात आले. यामध्ये ३ ग्रामसेवक, ५ आरोग्य सेवक, १ औषध निर्माण अधिकारी, ३ कनिष्ठ सहायक लेखा अशा एकूण १२ गट ड कर्मचारी यांना गट क पदावर मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे यांच्या हस्ते जिल्हा परिषदेच्या कै. रावसाहेब थोरात सभागृहात नियुक्ती आदेश देण्यात आले.
जिल्हा परिषद सेवेत कार्यरत असतांना मृत पावलेल्या अधिकारी व कर्मचारी यांच्या कायदेशीर वारसांना अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्याचे शासनाचे धोरण आहे. त्यासाठी अधिकारी व कर्मचारी यांच्या मृत्यू नंतर कायदेशीर वारसाने १ वर्षांच्या आत कार्यरत कार्यालयाच्या माध्यमातून प्रस्ताव मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सादर करावे लागतो. त्यानुसार अनुकंपा ज्येष्ठता सूचीत संबंधित वारसाचा समावेश होतो. जिल्हा परिषदेतील एकूण रिक्त पदांच्या २०% पदांवर अनुकंपा वारसांना नियुक्ती देण्यात येते.
तथापि शैक्षणिक व व्यावसायिक अहर्ता असतांना जर गट क संवर्गात पद रिक्त नसेल तर संबंधित वारसांना गट ड संवर्गात नियुक्ती दिली जाते व रिक्त पदांनुसार प्राधान्याने गट क पदावर नियुक्ती देण्यात येते. यानुसार नाशिक जिल्हा परिषदेत ३२ गट ड कर्मचारी यांची प्रतीक्षा यादी जिल्हा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली होती. यानुसार पात्र ठरलेल्या १२ गट ड कर्मचारी यांना दि. १२/०९/२०२४ रोजी गट क पदावर समुपदेशनाने नियुक्ती देण्यात आली. यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मारुती मुळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे, ग्रामपंचायत विभागाचे कनिष्ठ प्रशासन अधिकारी मंगेश चव्हाण यांच्या उपस्थितीत प्रशासनाने आवश्यकतेनुसार व कर्मचाऱ्यांची विनंती विचारात घेऊ समुपदेशनाने पदस्थापना देण्यात आली. उर्वरित २० कर्मचारी यांना रिक्त होणाऱ्या पदांनुसार पुन्हा संधी देण्यात येणार आहे.
त्याचबरोबर अनुकंपा मूळ प्रतीक्षा यादीतील वारसांची अंतिम ज्येष्ठता यादीनुसार कागदपत्रांची पडताळणी करून पात्र वारसांना देखील जिल्हा परिषद सेवेत सामावून घेण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांनी दिली.