संपूर्ण जग कोरोना महामारीशी लढत असतानाच अनेक देशात इतर आजारही झपाट्याने वाढत आहेत. लॅन्सेट जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अहवालानुसार, उच्च रक्तदाब असलेल्या तरुण रुग्णांची संख्या गेल्या ३० वर्षांमध्ये जगभरात दुप्पट झाली आहे. याबाबत जगभरात चिंता व्यक्त होत आहे. इम्पीरियल कॉलेज, लंडन संस्थेच्या नेतृत्वाखालील आंतरराष्ट्रीय स्तरावरील शास्त्रज्ञांच्या टिमने जगातील १८४ देशांमधील १०० दशलक्ष लोकांचे रक्तदाब मोजल्यानंतर हा दावा केला आहे. तसेच संशोधनानुसार, शास्त्रज्ञांनी या क्रमाने ३० ते ७९ वयोगटातील लोकांच्या उच्च रक्तदाबाचे ( बीपी ) मूल्यांकन केले आहे. त्यात तरूणांचे प्रमाण अधिक आढळले, तसेच कमी उत्पन्न असलेल्या देशांमध्ये या आजाराबाबत परिस्थिती अधिक भयानक आहे. काही शास्त्रज्ञांचा अंदाज आहे की, १९९० मध्ये उच्च रक्तदाबाने ग्रस्त महिलांची संख्या ३३१ दशलक्ष होती, तर पुरुषांची संख्या ३३७ दशलक्ष होती.२०१९ मध्ये ही संख्या ६२.६ आणि ६५.२ कोटी पर्यंत वाढली असावी, असा अंदाज आहे. इतकेच नव्हे तर दरवर्षी जगात लाखो लोक या रोगामुळे मरतात.
दरम्यान, शास्त्रज्ञांचा असा दावा आहे की, उच्च रक्तदाबाचा उपचार स्वस्त औषधांद्वारे शक्य आहे. आश्चर्याची बाब म्हणजे, वर्ष २०१९ मध्ये, जगातील उच्च रक्तदाबाने ग्रस्त असलेल्या निम्म्या लोकांना त्यांच्या रोगाबद्दल माहिती नव्हती. यामुळे त्यांना वेळेवर उपचार मिळू शकले नाहीत. याबाबत संशोधक प्रा. माजिद इजाती म्हणाले की, उच्च रक्तदाबाच्या गुंतागुंतीची प्रक्रिया यावर जगातील प्रगती देशात संशोधन होण्याची गरज आहे. शास्त्रज्ञांनी स्पष्ट केले आहे की, उच्च रक्तदाब हा दरवर्षी जगभरात ८.५ दशलक्ष मृत्यूंशी थेट संबंधित आहे. या रोगामुळे स्ट्रोक, हृदयरोग समस्या आणि मूत्रपिंड निकामी होणे अशा समस्या निर्माण होतात, परंतु लोकांना या आजाराचे गांभीर्य समजत नाही. या कारणास्तव, अचानक मृत्यूची प्रकरणे समोर येतात. तसेच शास्त्रज्ञांच्या मते, उच्च रक्तदाबाच्या रुग्णांची संख्या श्रीमंत देशांमध्ये कमी होत आहे. कॅनडा, तैवान, जपान, स्पेन आणि ब्रिटनमध्ये या आजाराचा त्रास कमी झाला आहे.