जयपूर (राजस्थान) – एखादी कृती सारखी केल्यानंतर ती आपल्या अंगवळणी पडते. पण ती सलग केल्याने त्याचे व्यसन कधी लागते हे आपल्याला कळत नाही. असं म्हणतात की कोणत्याही गोष्टीचे व्यसन वाईटच असते. कोरोना काळात सर्व व्यवहार ऑनलाइन झाल्यामुळे सतत मोबाईल हाताळले गेले. त्याचे चांगल्या गोष्टींसह नकारात्मक परिणामही झाले आहे. अनेकांना मोबाईलचे व्यसन लागले आहे. मुलांना मोबाईलपासून दूर ठेवता येणार नसले तरी त्यांच्या वापरण्याबद्दल प्रत्येक पालकाला जागरूक असणे आवश्यक झाले आहे. नसता त्याचे भयानक परिणाम मुलांवर होत आहेत. अशीच एक घटना राजस्थानमधील चुरूमध्ये घडली आहे.
राजस्थानच्या चुरू जिल्ह्यातील साहवा गावातील वीस वर्षीय युवकाला मोबाईलचे इतके व्यसन लागले की तो आता मानसिक रुग्ण झाला आहे. हा युवक पाच दिवस अजिबात झोपू शकला नाही. तो मोबाईलवर कधी गेम खेळत होता, तर कधी चित्रपट पाहात होता. तो स्वकीयांना ओळखू शकत नाहीये, तसेच बोलूही शकत नाही. प्रकृती खालावल्याने त्याला चुरू येथील शासकीय रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे.
युवकाचे काका अरबाज सांगतात, २० वर्षीय अक्रम गावात विजेच्या मोटारींच्या वाइंडिंगचे काम करत होता. दोन महिन्यांपासून तो दिवस-रात्र मोबाईलवर वेळ घालवत होता. त्याला मोबाईलचे व्यजन जडले. परिणामी त्याने व्यवसाय सोडून दिला होता. आप्तस्वकीयांनी विरोध केला तरी तो मोबाईल सोडत नव्हता. सकाळपासून ते रात्रीपर्यंत आणि दुसर्या दिवशी सकाळपर्यंत तो व्हिडिओ गेम खेळत होता. त्याने अन्न-पाणी सोडून दिले होते. पूर्वी तो मोबाईल पाहात जेवण करायचा, पाणी प्यायचा. परंतु गेल्या १५ दिवसांपासून त्याने खाणे-पिणेही पूर्णपणे बंद केले होते.
अक्रम पाच दिवसांपासून अजिबात झोपला नाही. कुटुंबीय झोपल्यानंतर तो रात्री मोबाईल पाहायचा. मानसिक रुग्णांसारखाच तो वागू लागला होता. त्यामुळे त्याला २६ नोव्हेंबरला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयाचे मानसिक रोग तज्ज्ञ डॉ. जितेंद्र कुमार म्हणाले, अक्रमचे सिटी स्कॅन करण्यात आले असून त्याच्या काही तपासण्या करण्यात आल्या आहेत. त्याची स्थिती मानसिक रुग्णासारखीच झाली आहे. त्याच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत. मोबाईलवर जास्त वेळ घालविल्यामुळे मानसिक आजार होण्याची शक्यता बळावते.