येवला – माजी नगराध्यक्षा आणि जेष्ठ समाजसेविका सुंदराताई लोणारी यांचे आज निधन झाले. सन १९९६ साली त्यांनी येवला शहराचे नगराध्यक्षपद भूषविले. नगराध्यक्षपद भूषवितांना त्यांनी आपल्या कार्याचा ठसा येवला शहरात उमटविला. लोकप्रतिनिधी म्हणून अनेक विकासकामे मार्गी लावली. सामाजिक कार्यातही त्या सक्रियपणे सहभाग घेत. त्यांनी येवला नगरपालिकेच्या रुग्णालयात देखील सेवा बजावली. नगरपालिका रुग्णालयातील त्यांचे कार्य देखील उल्लेखनीय ठरले. नगरपालिका रुग्णालयात कार्यरत असताना त्यांनी कुटुंब कल्याण कामात आपल्या कार्याचा ठसा उमटविला होता. त्यांना राज्य शासनाच्या राज्यस्तरीय पुरस्काराने, याशिवाय जिल्हा परिषद व येवला नगरपालिकेच्या वतीने पुरस्काराने सन्मानित केले होते. त्यांच्या निधनाने एका ज्येष्ठ आणि अनुभवी लोकप्रतिनिधीस येवलेकर कायमचे मुकले आहेत. मी व माझे कुटुंबीय लोणारी कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असून ईश्वर मृताच्या आत्म्यास चिरशांती देवो,हीच प्रार्थना करतो, असे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.