नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येवला तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत शिरसगाव लौकीचे विभाजन होऊन आता ‘लौकी शिरस’ ही नवीन स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करण्यास शासनाची मान्यता मिळाली आहे. त्यानुसार ग्रुप ग्रामपंचायत विभाजन होऊन ‘शिरसगाव लौकी’ व ‘लौकी शिरस’ या दोन स्वतंत्र ग्रामपंचायत निर्माण झाल्या आहे. तशी माहिती राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.
येवला तालुक्यातील शिरसगाव लौकी येथे ग्रुप ग्रामपंचायत अस्तित्वात होती. मात्र येथील नागरिकांनी ग्रुप ग्रामपंचायतचे विभाजन करून स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करण्याची मागणी केलेली होती. याबाबत १८ जानेवारी २०२२ रोजी ठराव पास करून शासनाकडे मागणी करण्यात आली होती. त्यानुसार विभागीय आयुक्तांकडून शासनास प्रस्ताव सादर करण्यात आलेला होता. याबाबत राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचा सातत्याने पाठपुरावा सुरू होता. या मागणीला यश मिळाले असून ‘लौकी शिरस’ स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करण्यास शासनाची मान्यता मिळाली आहे.
लौकी शिरस या गावाची लोकसंख्या १४९१ इतकी असून त्यांना विविध शासकीय कामांसाठी ग्रुप ग्रामपंचायतमध्ये जावे लागत होते. आता स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन झाल्याने येथील नागरिकांना सर्व नागरी सुविधा या गावातच उपलब्ध होणार आहे. त्याबद्दल नागरिकांनी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचे विशेष आभार मानले आहेत.
शिरसगाव लौकी या ग्रुप ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची मुदत ही ११ डिसेंबर २०२२ रोजी पूर्ण होणार असून यावेळी स्वतंत्र निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. येवला तालुक्यात एकूण ८९ ग्रामपंचायती कार्यरत होत्या आता लौकी शिरस ही स्वतंत्र ग्रामपंचायत निर्माण झाल्याने आता येवला तालुक्यातील ग्रामपंचायतींची संख्या एकूण ९० इतकी झाली आहे.
Yeola Group Grampanchayat Divided