नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – एनईपी २०२० (नवे शैक्षणिक धोरण २०२०) ची बीजे खुल्या आणि दूरस्थ शिक्षण प्रणालीत दडलेली आहेत. एनईपी २०२० मध्ये अनेक चांगली वैशिष्ट्ये असली तरी कोणत्याही संस्थेची प्रगती त्याच्या अंमलबजावणीच्या दृष्टीकोनावर आणि त्या संस्थेच्या अद्वितीय सामर्थ्यावर अवलंबून असते. स्वयंअध्ययन साहित्य (SLM) ही कोणत्याही मुक्त विद्यापीठाची खरी ताकद आणि कणा आहे आणि यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या बाबतीतही हे खरे आहे, यात शंका नाही, असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. इंद्र मणी यांनी केले. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या २८ व्या दीक्षांत समारंभाच्या दीक्षांत भाषणात विद्यार्थ्यांना संबोधताना ते बोलत होते. सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील होते.
या कार्यक्रमाला कुलसचिव तथा परीक्षा नियंत्रक भटूप्रसाद पाटील, व्यवस्थापन मंडळाचे सदस्य प्रा. डॉ. जयदीप निकम, प्रा. डॉ. अनिल कुलकर्णी, ‘सह्याद्री’ कृषी समूहाचे मुख्य संचालक विलास शिंदे, प्रा. सत्यकाम, डॉ. संजय चोरडिया, डॉ. नाठे, विद्वत परिषद सदस्य डॉ. कविता साळुंके, डॉ. प्रवीण घोडेस्वार, प्रा. डॉ. प्रकाश देशमुख, प्रा.डॉ. माधुरी सोनवणे, डॉ. सुनंदा मोरे, प्रमोद बियाणी, डॉ. सज्जन थूल, माधव पळशीकर, सुरेंद्र पाटोळे, डॉ. मधुकर शेवाळे, नियोजन मंडळाचे सदस्य डॉ. राम ठाकर, डॉ. मनोहर पाटील आदी उपस्थित होते.
स्वयंअध्ययन साहित्य ‘मुक्त’ची ताकद – डॉ. इंद्र मणी
डॉ. इंद्र मणी पुढे म्हणाले, कि स्वयंअध्ययन साहित्याची गुणवत्ता अनेक वेळा सिद्ध झाली आहे कारण ती विद्यापीठातील तज्ञ शिक्षक आणि त्याच बरोबर अभ्यास केंद्रांवर असणाऱ्या इतर सुप्रसिद्ध तज्ञांकडून तयार केली जातात. नोंदणीकृत विद्यार्थ्यांच्या घरापर्यंत स्वयंअध्ययन साहित्य पोहोचविण्याची तत्पर वितरण यंत्रणा, रविवारी किंवा शनिवारी अभ्यास केंद्रांवर तज्ज्ञ समुपदेशकांकडून विद्यार्थ्यांचे योग्य समुपदेशन, प्रश्नपत्रिकांचे ऑनलाइन वितरण, ऑनलाइन मूल्यमापन, विद्यार्थ्यांची परीक्षेतील चांगली कामगिरी आणि महाराष्ट्र राज्यभर विद्यापीठाने विकसित केलेले अतिशय चांगले प्रशासकीय यंत्रणा यामुळे विद्यापीठ स्वत:चा ब्रँड निर्माण करण्यात यशस्वी झाले आहे, असे सांगून त्यांनी प्रवेश आणि समता, शिक्षणाची गुणवत्ता, अनुदान, अभ्यासक्रम आणि मूल्यमापन, टेक्नॉलॉजी इंटिग्रेशन, एज्युकेशनल गव्हर्नन्स अँड मॅनेजमेंट,शिक्षक भरती आणि धारणा, समावेश आणि विविधता, जागतिकीकरण व टिकाऊपणा या आव्हानांबाबत सजग राहण्याचे आवाहन केले.
शिक्षणक्रम नव्या स्वरूपात – कुलगुरू
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० ने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार विद्यापीठातील विद्यमान सर्व शैक्षणिक शिक्षणक्रमांमध्ये बदल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. येत्या शैक्षणिक (२०२३-२४) वर्षापासून बहुतांश शिक्षणक्रम नव्या स्वरूपात दिले जाणार आहेत. अॅकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट (एबीसी) च्या नोंदणीची प्रक्रिया सुरू आहे आणि आम्ही सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत असून त्यांना शैक्षणिक बँक ऑफ क्रेडिटसाठी नोंदणी करण्यासाठी प्रेरित करीत आहोत, असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील यांनी केले.
कुलगुरू डॉ. पाटील पुढे म्हणाले कि, अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिटसाठी आतापर्यंत साडेचार लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. मला खात्री आहे की नजीकच्या भविष्यात बहुतेक विद्यार्थी शैक्षणिक बँक ऑफ क्रेडिटसाठी नोंदणी करतील. विद्यापीठाच्या अंतर्गत गुणवत्ता आश्वासन केंद्रामार्फत वार्षिक गुणवत्ता आश्वासन अहवाल नॅक कार्यालयात यशस्वीरित्या सादर करण्यात आला. विद्यापीठातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केले होते. यूजीसी आणि राज्य सरकारच्या अनुषंगाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2022 ची अंमलबजावणी करण्यासाठी लक्ष केंद्रित केले असून याबाबत विद्यापीठाच्या विद्याशाखा आणि विभागीय केंद्रांना सर्व प्रकारचे मार्गदर्शन देण्यात येत आहे, असेही ते म्हणाले. अध्यक्षीय भाषणात त्यांनी विद्यापीठाने राबविलेल्या विविध उपक्रमाबाबत माहिती दिली.
यावेळी विद्यापीठातर्फे पदविकाधारक २४५१८, पदव्युत्तर पदविकाधारक १२, पदवीधारक १ लाख १४ हजार ३२८, पदव्युत्तर पदवीधारक १६३६९, पी एच डी धारक ५ तर एम फीलधारक २ स्नातकांना पदवी प्रदान करण्यात आल्या. तत्पूर्वी सकाळी विद्यापीठ प्रांगणातील यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मानवंदना देण्यात आली. त्यानंतर प्रमुख अतिथी डॉ. इंद्र मणी, कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील, विद्यापीठच्या व्यवस्थापन मंडळाचे सदस्य, विद्वत परिषदेचे सदस्य, नियोजन मंडळ सदस्यांचे तुतारी व सनईच्या स्वरात मिरवणुकीने मुख्य व्यासपीठाजवळ आगमन झाले. कुलसचिव तथा परीक्षा नियंत्रक भटूप्रसाद पाटील यांनी मानदंडसह या मिरवणुकीचे नेतृत्व केले. मिरवणूक व्यासपीठावर येताच ‘ज्ञानगंगा घरोघरी’ या विद्यापीठ बोधचिन्हाची धून वाजविण्यात आली. सरस्वती वंदना, यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेचे पूजन आणि संत गाडगे बाबा जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन करून विद्यापीठ गीत, राष्ट्रगीत व महाराष्ट्र राज्य गीताने कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रेमनाथ सोनवणे व शुभांगी पाटील यांनी केले.
YCMOU All Courses Big Changes from This Year Vice Chancellor








