नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे यंदाच्या २०२२-२०२३ या शैक्षणिक वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेस सुरवात झाली आहे. राज्यभरातील विद्यार्थी विद्यापीठाच्या विविध प्रकारच्या शंभराहून अधिक शिक्षणक्रमांना ऑनलाईन पद्धतीने प्रवेश सुरु असल्याची माहिती विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव प्रा.डॉ. प्रकाश देशमुख यांनी दिली.
दूरस्थ शक्षण पद्धतीने शिक्षणाची ज्ञानगंगा घरोघरी पोचविण्याचे कार्य यशवंतराव चव्हाण महाराष्ट मुक्त विद्यापीठ गेली ३३ वर्ष सातत्याने व यशस्वीरीत्या करत आले आहे. नोकरी – व्यवसाय, घर – संसार किंवा इतर काही अडचणी व कारणांमुळे शिक्षणापासून वंचित राहिलेल्या समाजातील विविध स्तरातील लाखो विद्यार्थ्यांना विद्यापीठाने शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणले आहे.
बदलत्या काळाची गरज ओळखून स्पर्धा परीक्षांना उपयुक्त, नवीन व्यवसायाभिमुख व कौशल्याधारित अभ्यासक्रमही विद्यापीठातर्फे सुरु करण्यात आलेलें आहेत. विद्यापीठाच्या मानव्यविद्या व सामाजिकशास्त्रे, वाणिज्य व व्यवस्थापन, संगणकशास्त्र, विज्ञान व तंत्रज्ञान, निरंतर शिक्षण, आरोग्याविज्ञान, शिक्षणशास्त्र या विद्याशाखांच्या विविध प्रकारच्या शिक्षणक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात आलेली आहे. त्यात प्रमाणपत्र, पदविका, पदवी व पदव्युत्तर अशा अभ्यासक्रमांचा समावेश आहे.
गेल्या वर्षी विद्यापीठात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कोविडपश्चातही सुमारे पावणे सहा लाख होती. मानव्य विद्या व सामाजिक शास्त्रे शाखेत मराठी, उर्दू बी.ए.सह हिंदी, मराठी, उर्दू, इंग्रजी, ग्रंथालय व माहितीशास्त्र, अर्थशास्त्र, लोकप्रशासन या विषयात एम.ए. करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
वाणिज्य शाखेत एम.कॉम, एम.बी.ए. , बी.कॉम. , बीबीए करण्याची संधी आहे. याबरोबरच विज्ञान शाखेतही बीएस्सी बरोबरच विविध विषयात एमेस्सीचे शिक्षणक्रम उपलब्ध आहेत. याशिवाय पाणी व्यवस्थापन, बांधकाम पर्यवेक्षक, सलून, टेलरिंग, छायाचित्रण, व्हिडिओ निर्मिती, पटकथालेखन, सुरक्षारक्षक, ग्रामरोजगार सेवक, शेतकरी उत्पादक कंपनी व्यवस्थापन, पालीभाषा, सहकार व्यवस्थापन, पर्यावरण, शालेय व्यवस्थापन, घर कामगार कौशल्य असे विविध कौशल्याधिष्ठीत अनेक पदविका, प्रमाणपत्र शिक्षणक्रम विद्यापीठाने उपलब्ध करून दिले आहेत.
यंदाच्या वर्षी प्रवेश घेण्याची मुदत ही येत्या दिनांक ३१ ऑगस्ट २०२२ पर्यंत आहे. विद्यापीठातर्फे प्रवेश प्रक्रिया ही ऑनलाईन पद्धतीने राबविली जात आहे. अधिक माहिती व प्रवेश घेण्यासाठी www.ycmou.ac.in किंवा www.ycmoudigitaluniversity.ac या संकेतस्थळावर भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
Yashwantrao Chavhan Maharashtra Open University YCMOU Admission Process Started