शामली (उत्तर प्रदेश) – कोरोनाच्या संकटात आणखी काय काय घडेल याची कल्पनाच न केलेली बरी. दिवसागणिक नवनवीन घटना, घडामोडी समोर येत आहेत. कोरोनापासून बचावासाठी लस घेण्याला प्राधान्य दिले जात असताना येथे अजबच प्रकार घडला आहे. कोरोना लसीऐवजी चक्क रेबीजचे इंजेक्शन नागरिकाला दिल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
शामलीमध्ये कोरोना लस देण्याऐवजी तीन महिलांना रेबीजचे इंजेक्शन दिल्याने शुक्रवारी (९ एप्रिल) जिल्हाधिकार्यांनी कारवाई करत आरोग्य केंद्रात तैनात फार्मेसिस्टला निलंबित केले. त्याचबरोबर वैद्यकीय अधीक्षकांकडून तीन दिवसात स्पष्टीकरण मागितले आहे.
जिल्हाधिकारी जसजीत कौर यांनी कांधला येथील आरोग्य केंद्रात वृद्ध महिलांना कोरोना लस देण्याऐवजी रेबीजचे इंजेक्शन दिल्याची दखल घेत उपजिल्हाधिकारी आणि शामलीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल कुमार यांना चौकशीचे आदेश दिले होते. दोन्ही अधिकार्यांनी केलेल्या चौकशीत आढळले की, कांधला आरोग्य केंद्रात गुरुवारी तीन महिला कोविड लस घेण्यासाठी पोहोचल्या होत्या. परंतु चुकून त्या जनरल ओपीडीत गेल्या होत्या.
तिथे तैनात फार्मेसिस्ट कामानिमित्त बाहेर गेला होता. त्याने त्याच्या जागेवर एका औषधविक्रेत्याला बसवले होते. औषधविक्रेत्याने कागद न पाहता महिलांना अँटी रेबीजचे इंजेक्शन दिले. चौकशी अहवालाच्या आधारावर जिल्हाधिकार्यांनी संबंधित फार्मसिस्टला तत्काळ निलंबित करत खासगी औषधविक्रेत्याची सेवा बंद करण्याचे आदेश दिले. तसेच निष्काळजीपणा केल्यामुळे कांधलाच्या वैद्यकीय अधीक्षकांना तीन दिवसांत स्पष्टीकरण देण्याचे आदेश दिले आहेत.
असे होते प्रकरण
शामली येथील आरोग्य केंद्रात कोरोनाची लस घेण्यासाठी तेथील रहिवासी रसोज (७०), अनारकली (७२), सत्यवती (६०) गेल्या होत्या. आरोग्य केंद्रात त्यांना कोरोनाऐवजी रेबीजची लस देण्यात आली. सरोज यांची प्रकृती बिघडल्यानंतर या घटनेचा खुलासा झाला. त्यानंतर तिन्ही महिलांच्या कुटुंबीयांनी उच्च अधिकार्यांकडे तक्रार करत या घटनेच्या चौकशीसह कारवाईची मागणी केली होती.