इंडिया दर्पण विशेष – भटकूया आनंदे – तीर्थस्थान आणि दुर्ग कावनई

तीर्थस्थान आणि दुर्ग कावनई

ऐन उन्हाळ्यात शहरामध्ये फिरणंही अवघड झालं आहे. मग कुठे ट्रेकला जाणं तर दूरच. पण वसंताच्या या दिवसांत झाडांना फुटलेली नवपालवी आणि विविध रंगांच्या फुलांचा बहर अनुभवायचा तर मग घरातून बाहेर निघायलाच हवं. नाशिकरांनी सकाळी लवकर घर सोडलं तर दुपारच्या जेवणापयर्ंत पुन्हा परतता येईल अशा आटोपशीर भटकंतीचा छोटा आणि टूमदार ‘कावनई’ किल्ला आपल्याला खूणावतोय…
सुदर्शन कुलथे
गिर्यारोहक व दुर्ग अभ्यासक
देवभूमी नाशिकमध्ये अजून सिंहस्थ कुंभमेळ्याची सांगता झालेली नाही. सिंहस्थ पर्वणीच्या तिथींना पाण्याची तेवढी टंचाई नव्हती. पण मुख्य पर्वणी काळ लोटला आणि काही दिवसांतच पाण्याचं तीव्र दुर्भिक्ष्य निर्माण झालं आहे. नाशिकमध्ये कुंभमेळा भरणार्‍या ठिकाणांची पार्श्‍वभूमी बघितली तर त्र्यंबकेश्‍वर आणि नाशिकच्या गोदाघाटाबरोबरच अजून एक नाव पुढे येतं ते म्हणजे ‘कावनई’.
सांख्यतत्वज्ञानाचे जनक असलेल्या कपिलमुनींचा आश्रम असलेले हे कावनई एक पावन तीर्थस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. कावनई किल्ल्याच्या पायथ्याशी असलेला कपिलमुनींचा आश्रम बघण्यासारखा आहे. इथे गोमुखातून सतत पाणी निघत असते. गोमुखातून पडणार्‍या संततधारेमुळे या स्थळाचे नांव कपिलधारा तीर्थ असे पडले आहे. त्यापुढे बांधीव असे पाण्याचे कुंड तयार केलेले आहे.

कुंडातले पाणी अगदी काचेसारखे स्वच्छ असून त्यात मासे आणि कासव आहेत. हा आश्रम इथे अगदी प्राचीनकाळापासून आहे असे सांगीतले जाते. सातव्या शतकात भारतभ्रमणासाठी आलेल्या चीनी प्रवासी ह्युएन स्तेंग यानेही इथे भेट दिली होती. त्यावेळी त्याने आठवण म्हणून दिलेली चीनी घंटा या आश्रमात आजही बघायला मिळते. परंतु ही तबक प्रकारातली घंटा दुसऱ्या कुठल्या बौद्ध भिक्षू कडून दिली गेली असेल असे वाटते कारण, ह्युएन स्तेंग भेटीचा कुठलाही पुरावा नाही. कपिलमहामुनींना आपले इष्टदेव मानणार्‍या महानिर्वाणी आखाड्यासहीत कावनईच्या तीर्थावरही शाहीस्नानाची परंपरा आहे. असो.
कपिलधारा तीर्थ आश्रमाच्या पाठीशी उभा असलेला कावनई किल्ला इथून जरी उंच आणि मोठा दिसत असला तरी फार जास्त चढाईचा नाही. समुद्रसापाटीपासून ९१४ मीटर (३००० फूट) उंच असलेला कावनई पायथ्यापासून फार उंच नाही. किल्ल्याची पश्‍चिमेकडील डोंगरधार कावनई गावात येऊन मिळाली आहे. तिथूनच किल्ल्यावर चढाईला सुरुवात करायची. वर जाणारी वाट तशी अगदी ठळक असल्याने चुकण्याचा काही संबंध नाही.
काही ठिकाणी मुरमाड माती असल्याने घसरडी झालेली आहे पण धोकेदायक नाही. कावनई किल्ल्याच्या या मार्गावर फार झाडी नाही पण इतरत्र मात्र निवडूंग, बाभळी, निंब आणि पळस आदी झाडांचे विरळ असे वन आहे. पायवाटेने थोडं वर चढून आल्यावर आपण किल्ल्याच्या वरच्याभागात असलेल्या कातळ कड्याच्या खाली जाऊन पोहोचतो.

इथून किल्ल्याच्या उत्तर बाजूला मध्यभागी कातळात एक घळ दिसते. त्याघळीमध्ये वरच्या अंगाला कावनईचे प्रवेशद्वार आहे. खाली गावातून कितीही हळू आणि रमतगमत चढाई केली तरी तीस-चाळीस मिनीटांत आपण या प्रवेशद्वाराशी पोहोचतो. प्रवेशद्वारात पोहोचतांना घळ अतिशय अरूंद होत गेलेली आहे. त्यातून जरा सांभाळून चढावं लागतं. पण अगदीच अवघड अशा ठिकाणी दणकट अशी शिडी लावलेली आहे त्यावरून आपण सहज प्रवेशद्वारात येऊन पोहोचतो. छोट्या आकाराचे हे प्रवेशद्वार देखणे आहे. आत गेल्यावर एक गुहा कोरलेली दिसते. बहुदा पहारेकर्‍यांसाठी असावी. प्रवेशद्वारातून वर जाणार्‍या दहा -पंधरा पायर्‍या चढून गेलं की आपल्याला गडमाथ्यावर प्रवेश मिळतो.
कावनईचा गडमाथा फार विस्तृत नसला तरी त्यावर भला मोठा पाण्याचा तलाव आहे. शांत पाणी असलेल्या या तलावात कुरमुर्‍यांसारखा काही खाऊ टाकला तर शेकडोंच्या संख्येने असलेले मासे तीव्र हालचाली करत खाण्यासाठी वर येतात आणि संपूर्ण तलावाच्या पाण्यावर अनेक तरंग उठतात. बाराही महिने भरपूर पाणी असलेल्या या तलावा भोवती काही गडावशेष विखूरलेले आहेत.
तलावाच्या आजूबाजूला अनेक ठिकाणी महादेवाची पिंड आणि नंदी बघायला मिळतात. तलावाला लागूनच छोटेसे देवी मंदिर आहे. या देवीला पण ‘कावनई’ नावाने ओळखतात. जवळच उद्धवस्त वाड्याचे अवशेष आहेत. तिथे एका साधूबाबाची कुटीया आहे. हे बाबा येणार्‍या सर्वांना भेटतात आणि त्यांच्यापरीने माहिती सांगतात. माथ्यावरील पुर्वेकडील भागावर काही बुरुज आणि तटबंदी दिसून येते.
तसं पहिलं तर उभ्या सरळसोट कातळकड्यांमुळे गडाच्या इतर भागात तटबंदी उभारण्याची गरज भासलेली नाही. इथेही पाण्याची दोन-तीन टाकी आहेत. या भागातून खाली कपिलधारा आश्रमाचा भाग आणि कावनई गाव न्याहाळता येतं. बाकी गडमाथ्यावर भरपूर गवत आणि छोटी झुडूपं माजलेली दिसतात. कावनईच्या माथ्यावरून अलंग, मदन, कुरंग सहीत संपूर्ण कळसूबाई रांग एकाच फ्रेममध्ये नजरेत भरते. तर त्र्यंबकरांगेतीलही अनेक मानाचे पर्वत मान उंच करून आपल्याला साद घालतांना दिसतात.
खालच्या आश्रमात ‘कावनई’ या नावाबद्दल थोडं विचारलं तेव्हा तिथल्या साधूबाबांनी रामायणातल्या प्रसंगाचा संदर्भ दिला.

हनुमानाने जेव्हा द्रोणागिरी पर्वत उचलून नेला तेव्हा त्याला वाटेत ‘कालनेमी’ नावाचा राक्षस आडवा आला. याच ठिकाणी राक्षसाबरोबर युद्ध झाले आणि हनुमानाने त्याला ठार मारले म्हणून या स्थळाचे नाव ‘कावनई’. असो. इतिहासात चिमाजी अप्पांनी कावनई किल्ल्याचे वर्णन केलेले आहे. ‘कावनई किल्ला आटोपसार, कडे थोर, पाणी पुस्कल सेंभर माणसांनी राखावा सारिखा आहे’ त्या आधी इ.स. १६७०-७२ च्या सुमारास कावनई हा स्वराज्याच्या यादीत होता. यानंतर १६८८ च्या सुमारास मोगलांनी किल्ल्याला वेढा घालून ताब्यात घेतल्याचा उल्लेख आढळतो. कावनई हा किल्ला टेहाळणीसाठी तसेच या परिसरातील मार्गावर देखरेखीसाठी उपयोगात आणला जात असावा.
कसे जाल
नाशिकहून मुंबई-आग्रा महामार्गावरून घोटीच्या अलिकडे कावनईला जाण्यासाठी फाटा फुटतो.
नाशिकपासून अंतर किती
नाशिक ते कावनई ४३ कि.मी.; घोटी ते कावनई ८ कि.मी.