नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कुस्तीपटूंचे दिल्लीतील आंदोलन बळजबरीने संपुष्टात आणल्यानंतर त्याचे पडसाद जागतिक स्तरावर उमटायला लागले आहेत. एकीकडे देशभरातील क्रीडा संघटना व दिग्गज खेळाडू कुस्तीपटूंसोबत उभे झाले आहेत, तर दुसरीकडे जागतिक कुस्ती संघटनेने आंदोलनाच्या अखाड्यात एन्ट्री घेतली आहे.
भारतात आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंना मिळालेली वागणूक बघून जागतिक कुस्ती संघटना अस्वस्थ झाली आहे. संघटनेने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून त्याबद्दल स्पष्ट नाराजी व्यक्त केली आहे. कुस्तीपटूंची अतिशय वाईट पद्धतीने धरपकड करण्यात आली असून हे निषेधार्हच आहे. जागतिक कुस्ती संघटनेच्या प्रशासकीय यंत्रणेने याची दखल घेतली आहे, असे त्यांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे भारताचा माजी फिरकीपटू अनिल कुंबळे यानेही जाहीरपणे नाराजी व्यक्त केली आहे. भारतीय कुस्तीपटूंना मिळालेली वागणूक वाईट होती, त्यामुळे जे घडले ते बघून वाईट वाटले. संवादाने प्रश्न सोडविता येतात. यावर आता लवकरात लवकर तोडगा निघावा, अशी अपेक्षा अनिल कुंबळे याने व्यक्त केली आहे. तसेच भालाफेकपटू नीरज चोप्रा यानेही कुस्तीपटूंना मिळालेल्या वागणुकीवर नाराजी व्यक्त केली आहे. हा संघर्ष चांगल्या पद्धतीने हाताळता आला असता, असे त्याने म्हटले आहे.
तर भारतीय कुस्ती महासंघाचे निलंबन
जागतिक कुस्ती संघटनेने व्यवस्थेवर नाराजी व्यक्त करतानाच भारतीय कुस्ती महासंघाला निलंबनाचा इशारा दिला आहे. तसे झाल्यास ही केवळ कुस्ती क्षेत्रासाठीच नव्हे तर संपूर्ण भारतासाठी लाजीरवाणी बाब असणार आहे. त्यामुळे यात सरकारने लक्ष घालावे, अशी मागणी होत आहे.
निवडणुक कधी?
जागतिक कुस्ती संघटनेने भारतीय कुस्ती महासंघाला नव्या निवडणूकीची कार्यपद्धती तातडीने राबविण्याची सूचना केली आहे. विशेष म्हणजे कुस्तीगिरांच्या सुरुवातीच्या निषेधानंतर क्रीडा मंत्रालयाने महासंघाची निवडणूक प्रक्रिया स्थगित करून ती नव्याने राबविण्यासाठी स्वतंत्र समिती स्थापन केली होती. या समितीला यासाठी ४५ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. आता समितीच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Wrestling Federation India WFI World Organization