इंडिया दर्पण विशेष लेखमाला
जगातील सर्वांत मोठे मंदिर – भाग १५
९ एकर जागेवर वसलेले
त्रिचुरचे वडक्कूनाथन मंदिर!
(क्षेत्रफळ ८१,००० स्क्वेअर फुट)
केरळच्या त्रिचुर या सुप्रसिद्ध नगरांत वडकुनाथान या नावाचे प्राचीन शिव मंदिर आहे. या मंदिराला टेंकैलाशम किंवा ‘ऋषभाचलम्’ असेही म्हणतात.वडकुनाथन मंदिर निसर्ग सौंदर्याने वेढलेले आहे. श्रद्धाळूंसाठी हे एक अध्यात्मिक आणि मन:शांती देणारे स्थान आहे. सुमारे ९ एकर जागेवर हे मंदिर बांधलेले आहे. शहराच्य मध्यभागी एक उंच टेकडीवर हे मंदिर आहे. हे प्राचीन मंदिर दगडांच्या मोठ मोठ्या भिंतींनी संरक्षित केलेले आहे.
‘वडकुनाथन ‘म्हणजे ‘उत्तरेचा नाथ’
त्रिचुर हे केरळमधील प्राचीन आणि सुंदर शहर आहे. ही केरळची सांस्कृतिक राजधानीच आहे .पूर्वीच्या कोचीन संस्थानाचे महाराज राम वर्मा (९वे) शक्तन तम्बुरान (१७९०-१८०५) यांच्या वेळी त्रिचुर ही संस्थानची राजधानी होती. नगरच्या मध्यभागी ९ एकर जागेवर उंच परकोट असलेले विशाल शिवमंदिर आहे हेच ते ‘वडकुनाथन मंदिर. ‘वडकुनाथन’चा अर्थ होतो ‘उत्तरेचा नाथ’.बहुतेक केदारनाथ ला अनुलक्षून असे म्हटले असावे.
आदि शंकराचायांची समाधी
प्राचीन साहित्यात या संदर्भात एक उल्लेख सापडतो तो म्हणजे आदि शंकराचार्याच्या माता पित्याने संतान प्राप्ती साठी या मंदिरांत अनुष्ठान केले होते. आणखी एक संबंध आहे तो म्हणजे येथेही आदि शंकराचार्यांची तथाकथित समाधी आहे. त्याच प्रमाणे येथे आदि शंकराचार्यांचे लहानसे मंदिर असून तेथे त्यांची मूर्ती देखील आहे.आदि शंकराचार्यांची एक समाधी केदारनाथ मंदिरा च्या मागे देखील आहे हे येथे उल्लेखनीय आहे.
पूरम नावाचा उत्सव
वडकुनाथनमंदिराच्या चारी बाजूंनी सुमारे ६० एकर जागेवर सागाचे घनदाट जंगल होते. हे जंगल शक्तन तम्बुरान यांनी कापून तिथे ३ किमी गोलाकार सडक निर्माण केली होती. हल्ली यालाच स्वराज्य राउंड म्हणतात. त्यावेळी एका चकन्या माणसाने हे जंगल तर शिवाच्या जटा आहेत म्हणून जंगल तोडीस विरोध केला होता. त्यावेळी या राजाने स्वत: त्या माणसाचा शिरच्छेद केला होता असे म्हणतात. याच मंदिरांत एप्रिल-मे महिन्यात पूरम नावाचा उत्सव होतो तो पाहण्यासाठी परदेशी पर्यटकासह लाखो भाविक येतात.
वडकुनाथन हे शिव मंदिर त्रिचुर शहराच्या मध्यभागी आहे. केरळची प्राचीन शैली अतिशय उत्कृष्ट प्रकारे दर्शविणारे हे मंदिर उत्कृष्ट कला आणि वास्तुकलेसाठी प्रसिद्ध आहे. हे मंदिर केरळमधील भगवान शिवाचे पहिले मंदिर असून खुद्द भगवान परशुराम यांनी त्याची निर्मिती केली आहे अशी मान्यता आहे.
वैशिष्ट्ये
वडकुनाथन हे शिवमंदिर एक हजार वर्षांचे प्राचीन मंदिर आहे. केरळ मधील अतिशय प्राचीन आणि उत्तम श्रेणीचे मंदिर म्हणून हे मंदिर प्रसिद्ध आहे.या मंदिरांत देवी पार्वती ची देखील पूजा केली जाते. युनेस्कोने जागतिक वारसा म्हणून या मंदिराला मान्यता दिली आहे.
या मंदिरांत भगवान शंकरांचा अभिषेक तुपाने केला जातो परंतु उन्हाळ्यात देखील येथील शिवपिंडीवरचे तूप वितळत नाही असे म्हणतात. शिवपिंडी वर टाकलेले तूप जर वितळले तर काहीतरी अघटित घडेल असे सांगितले जाते. तुपाच्या जाड थराने येथील शिवलिंग कायम झाकलेले असते. पारंपरिक श्रद्धे नुसार इथले तुपाने अच्छादलेले शिवलिंग बर्फाच्छादित कैलास पर्वताचे प्रतिक आहे. हे एकमात्र शिवलिंग असे आहे जेथे भाविकांना शिवलिंग दिसत नाही तर त्या ठिकाणी 16 फुट उंचीचा तुपाचा उंचवटा दिसतो,
या मंदिरात दरवर्षी महाशिवरात्रीला “लक्ष्य दीपम” नावाचा उत्सव साजरा केला जातो त्यावेळी लाखो दिवे येथे पेटविले जातात. येथे अनायुट्टू नावाचा हत्तींचा उत्सव साजरा केला जातो त्यावेळी हत्तींना नैवेद्य भोग दिला जातो.
वास्तुकला
वडकुनाथन मंदिर निसर्ग सौंदर्याने वेढलेले आहे. श्रद्धालुसाठी हे एक अध्यात्मिक आणि मन:शांती देणारे स्थान आहे. सुमारे ९ एकर जागेवर हे मंदिर बांधलेले आहे. शहराच्य मध्यभागी एक उंच टेकडीवर हे मंदिर आहे. हे प्राचीन मंदिर दगडांच्या मोठ मोठ्या भिन्तीनी संरक्षित केलेले आहे.मंदिराच्या चारी दिशांना मोठ मोठे गोपुरम म्हणजे प्रवेशद्वार आहेत. आतली मंदिरं आणि बाहेरील भिंत यांत मोठी मोकळी जागा आहे.
येथील एक व्यापक गोलाकार ग्रेनाईट भितीने आतील आणि बाहेरील मंदिरं अलग केली आहेत. या मंदिरांत म्युरल शैलीत महाभारतातील अनेक प्रसंगांची चित्रं काढलेली आहेत. यांत वासुकी शयन आणि न्रिथानाथा दिसतात त्यांची दररोज नित्यपूजा केली जाते. या मंदिरांत एक संग्रहालय देखील आहे येथे अनेक जुन्या पेंटिंग, लकड़ावरील नक्षीकाम आणि असंख्य जुन्या प्राचीन वस्तू पहायला मिळतात.
इतिहास
ब्रह्मांड पुराण आणि इतर प्राचीन धार्मिक ग्रंथानुसार हे मंदिर भगवान परशुराम यांनी निर्माण केले असे मानले जाते. मलयालम इतिहासकार वीविके वालथ यांच्या मतानुसार हे मंदिर पूर्वी कधीतरी द्रविड़ कवू म्हणजे देवस्थल होते. पुढे सहाव्या शतकानंतर अस्तित्वात आलेल्या धर्म सम्प्रदायाच्या प्रभावाखाली आले ज्यात बौद्ध ,जैन आणि वैष्णव यांचा समावेश होतो. भगवान परशुराम यानी सर्व प्रथम वडकुनाथन मंदिर निर्माण केले आणि त्यानंतर त्यांनी अनेक मंदिरं बांधली. परंतु हे मंदिर सर्व प्रथम बांधले त्यामुले त्याचे विशेष महत्व मानले जाते.
कसे जावे
वडकुनाथन मंदिर अशा जागी आहे. जेथे जाण्यासाठी विमान, रेल्वे ,सडक मार्ग उपलब्ध आहेत. त्रिचुर येथे रेल्वे स्टेशन आहे. कोचीचे विमानतळ जवळ असून येथे येण्यासाठी चांगले रस्ते आहेत.
-विजय गोळेसर मोबा.९४२२७६५२२७
Worlds Largest Temple Vadakkunath Kerala by Vijay Golesar