दुबई – ‘कागद तयार करण्याचा शोध लागला आणि जिवंत झाडांवर कुऱ्हाडी चालू लागल्या’, असे म्हटले जाते. कागद बनविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षांची तोड होत असल्याने पर्यावरणाची मोठी हानी होते. परंतु आधुनिक काळात कागदी आवश्यक गोष्ट असल्याचे सांगण्यात येते. मात्र आता संगणक युगात कागदाची गरजच उरली नसून अनेक ठिकाणी पेपरलेस व्यवहार सुरू आहेत. अनेक कार्यालयांमध्ये पेपरलेस कामकाज चालते. त्यामुळे वृक्षतोड थांबून पर्यावरणाचे नुकसान होत नाही. याचा आदर्श परदेशातील एका सरकारने निर्माण केला आहे.
दुबई सरकार हे जगातील पहिले पेपरलेस सरकार ठरले आहे. याची घोषणा करताना, अमीरातचे क्राउन प्रिन्स शेख हमदान बिन मुहम्मद बिन रशीद अल मकतूम यांनी सांगितले की, या निर्णयामुळे 350 दशलक्ष अमेरिकन तसेच 14 दशलक्ष मनुष्य-तासांची बचत होईल.
https://twitter.com/HamdanMohammed/status/1469631730286047238?s=20
शेख यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, दुबई सरकारमधील सर्व अंतर्गत आणि बाह्य व्यवहार आणि सर्व प्रक्रिया आता 100 टक्के डिजिटल आहेत आणि सर्वसमावेशक डिजिटल सरकारी सेवा मंचाद्वारे व्यवस्थापित केल्या जातात. या ध्येयाची प्राप्ती म्हणजे दुबईच्या मानवी जीवनातील सर्व पैलू डिजिटल करण्याच्या प्रवासातील एका नवीन टप्प्याची सुरुवात आहे.
दुबईची पेपरलेस रणनीती सलग पाच टप्प्यांत राबविण्यात आली आणि प्रत्येक टप्प्यात दुबई सरकारच्या विविध गटांचा समावेश होता. पाचव्या टप्प्याच्या शेवटी, अमिरातीमधील सर्व 45 सरकारी विभागांमध्ये ही रणनीती लागू करण्यात आली. हे सर्व विभाग 1,800 डिजिटल सेवा आणि 10,500 पेक्षा जास्त मोठे व्यवहार प्रदान करतात.