इंडिया दर्पण विशेष लेखमाला
– जगातील सर्वांत मोठे मंदिर – भाग १३
दक्षिणेची द्वारका
मन्नारगुडीचे राजगोपालास्वामी मंदिर!
(क्षेत्रफळ ९३,००० चौमीटर)
तामिळनाडुतील मन्नारगुडी येथील श्री विद्या राजगोपाल हे वैष्णव मंदिर एक हजार वर्षांपासून सुप्रसिद्ध आहे. या मंदिरात राजगोपालस्वामी या नावाने भगवान श्रीकृष्णाची पूजा केली जाते. तेवीस एकर म्हणजे ९३,००० स्क्वेअर मीटर जागेवर वसलेले हे मंदिर दक्षिणेतील प्रमुख वैष्णव मंदिर आहे. दक्षिण भारतात गुरुवायुर सारखे विख्यात वैष्णव मंदिर असतांना देखील या मंदिराला दक्षिणेची द्वारका असे म्हणतात. यावरून या मंदिराचे महत्व लक्षांत येते.
अकराव्या शतकातील मंदिर
येथील पहिले मूळ मंदिर दहाव्या शतकांत कुलोथुंगा चोला प्रथम याने बांधले. त्यानंतर चोला सम्राट राजराज चोला तृतीय, राजेन्द्र चोला तृतीय यांनी आपल्या कार्यकाळात या परिसरांत नवीन मंदिरांची भर टाकली तर सोळाव्या शतकांत तंजावुरच्या नायक राजांनी हे मंदिर अधिक वाढविले. सुमारे ७०० वर्षांत या मंदिराचे तीन वेळा नुतनीकरण केल्याचा उल्लेख धार्मिक ग्रंथांत देखील आहे. मंदिर परिसरातील सर्व मंदिरं आणि ९ लहानमोठे तलाव ग्रेनाईट पासून बांधलेल्या संरक्षक भिंतीने सुरक्षित करण्यात आली आहेत.
अतिभव्य राजगोपुरम
या मंदिराचा प्रवेशद्वाराला राज गोपुरम असे म्हणतात. हे राजगोपुरम ५९ मीटर म्हणजे १९२ फुट उंच आहे. मंदिराच्या बाहेर मंदिराला लागूनच ‘हरिद्रा नदी’ नावाचा देशातील सर्वांत मोठा तलाव आहे.
येथेच गोपिल्लार आणि गोप्रलयार या संतांना पुंडरीकाक्षणच्या रुपाने श्रीकृष्णानेच दर्शन दिले असे म्हटले जाते. मन्नारगुडीचा इतिहास राजगोपालस्वामी मंदिरा भोवतीच फिरतो. मंदिराच्या पूर्वेला मोठे प्रवेशद्वार आहे. तर ईशान्य दिशेला मंदिराचे प्रमुख तलाव आहे. प्रवेशद्वाराच्या सरळ रेषेत मध्यवर्ती मंदिर आहे. याच्या जवळच दगडी ध्वजस्तंभ आणि अनेक खांब असलेले सभागृह आहेत.
तेरा फुट उंच राजगोपालस्वामी
मंदिराच्या गर्भगृहातील राजगोपालस्वामींची मूर्ती बैठी असून १५६ इंच म्हणजे 13 फुट उंच आहे. त्याच्या एका बाजूला सत्यभामा तर दुसर्या बाजूला रुक्मिणी आहेत.
मंदिराच्या सुरुवातीलाच मोठा तलाव आहे पावसाळयातील पाणी याच तलावात साठविले जाते.हे पाणी वर्षभर मंदिरातील नित्यपूजा व इतर कामासाठी वापरतात.
राजगोपालस्वामी मंदिराच्या परिसरांत १६ गोपुरम म्हणजे प्रवेशद्वार, ७ प्रकारम (प्रदक्षिणा मार्ग), २४ विविध देवतांची मंदिरं, ७ मंडपम(सभागृह) आणि ९ पवित्र कुंड किंवा तलाव यांचा समावेश आहे.
अकराव्या शतकातील उत्सव मूर्ती
देवाची उत्सव मूर्ती ब्रांझची असून चोल राजांच्या काळातील म्हणजे ११व्या शतकातील आहे. मूर्तीवर त्या काळातील केश रचना आणि दागिने कोरलेले आहेत.
मंदिराच्या प्रमुख तलावाचे नाव हरिद्र नदी असून हा तलाव ११५८ फुट लांब, ८३७ फुट रुंद असा सुमारे २३ एकर जागेवर पसरलेला आहे. त्यामुळे हा तलाव देशातील सर्वांत मोठा मंदिर तलाव म्हणून प्रसिद्ध आहे.
मंदिराच्या दुसर्या प्रांगणात सेंगमालाथयार किंवा हेमाभुजावल्लीचे मंदिर आहे. या मंदिरांत १००० खांबांचे सभागृह आहे.
मंदिरातील वास्तुकला
राजगोपालस्वामी मंदिरातील पहिले बांधकाम इ.स. १०७० ते ११२५ या काळात राज्य करणार्या कुलोथुंगा चोला प्रथम याच्या कारकिर्दीत बांधले असल्याचा शिलालेख येथे उपलब्ध आहे. मन्नारगुडी नगराचा पाया श्री राजथी राजा चतुर्वेदी मंगलम याने रचला आणि या मंदिराच्या भोवती हे नगर वाढू लागले. चोला साम्राज्याचे पुढचे राजे राजराज चोला तृतीय, राजेंद्र चोला तृतीय आणि तंजावरचे नायक वंशाचे राजे अच्चुत देव राय यांनी या मंदिरात विविध देव देवतांची मंदिरे,गोपुरम आणि तलाव यांची भर टाकली. येथील शिलालेखांवरून होयसाल वंशाचे राजे विजयनगरचे राजे आणि नंतर नायक वंशाचे राजे तसेच मराठे सरदार यांनी या मंदिराच्या नवनिर्माण ,पुनरुज्जीवन आणि दुरुस्ती साठी वेळोवेळी सढळ हाताने मदत केली.
तंजावरच्या नायक घराण्यातील शासनकर्त्यांनी या मंदिराला आपले कुलदैवतच मानले त्यामुळे या मंदिराची राजेशाही पद्धतीने काळजी घेतली गेली व देखभाल केली गेली.
या मंदिराची आज दिसणारी प्रमुख वैशिष्ट्ये म्हणजे येथील १००० खांबांचे सभागृह, मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार म्हणजे मुख्य गोपुरम आणि मंदिरा भोवतीची ग्रेनाईट दगडा पासून निर्माण केलेली प्रचंड मोठी संरक्षक भिंत विजयराघव नायक राज्याच्या काळात इ.स. १५३२ ते १५७५ या कालखंडात बांधली गेली. रघुनाथभ्युदयाम या नायक राजांनी या मंदिराला किंमती आभूषणे दिली. तसेच मन्नारगुडी येथून श्रीरंगमचे रघुनाथस्वामी मंदिर पाहता यावे यासाठी मंदिरात एक उंच गोपुरम बांधले. नायक राजाना संगीताची आवड असल्याने त्यांनी या दोन्ही मंदिरांत संगीत कलेला भरपूर प्रोत्साहन दिले. मंदिराच्या पूजा साधनेत मुखविणा,दंडे, कोम्बू,चंद्रवलय,भेरी आणि नादस्वरम या वाद्यांच्या नित्य उपयोगाला चालना दिली.
सुप्रसिद्ध इतिहासकार के.व्ही.सुंदरराजन यांच्या नुसार दक्षिण भारतातली रघुनाथाची मंदिरं नवव्या आणि दहाव्या शतकात सिस्टिमॅटिक पद्धतीने बांधली गेली आहेत. कोविलाड़ी येथील अप्पाक्कूदाथन पेरूमल मंदिर, थिरुकोश्तियुर येथील स्वामी नारायण पेरूमल मंदिर, थिरूवल्लूर येथील वीरराघव पेरूमल मंदिर आणि श्रीरंगपत्तन येथील रंगनाथ मंदिर ही रघुनाथाची एकमेकांना पूरक उपमंदिर आहेत असे ते म्हणतात.
वार्षिक उत्सव
या मंदिरात दररोज सहा पद्धतीने देवाची पूजा केली जाते.तसेच वर्षभरात तीन मोठे उत्सव साजरे केले जातात. यात मार्च-एप्रिलमध्ये येणार्या तमिळ महिना ‘पंगुनी’मध्ये रथोत्सव हा सर्वात मोठा उत्सव असतो. रथोत्सव किंवा रथयात्रा हा उत्सव देखील मोठ्या प्रमाणात साजरा करतात त्यावेळी मन्नारगुडीच्या रस्त्यावरून रथाची मिरवणुक काढतात. आसपासच्या गावातील लोक यावेळी हजारोंच्या संख्येने येतात.
मंदिरात १८ दिवस चालणारा पंगुनी ब्रह्मोत्सव हा प्रमुख उत्सव साजरा केला जातो. कृष्णाने लहानपणी गोपिंची वस्त्रे लपविली होती या प्रसंगावर हा उत्सव साजरा करतात. पिन्नै नावाच्या झाडावर उत्सव मूर्ती ठेवतात झाडाच्या सर्व फांद्या रंगीत वस्त्रे आणि दागदागिने यांनी सजवितात.त्याच प्रमाणे डिसेम्बर -जानेवारीत वैकुंठ एकादशी सप्टेम्बर-ऑक्टोबर मध्ये नवरात्री तसेच दहिहंडी हे उत्सव देखील मोठ्या उत्साहात साजरे करतात.
धार्मिक महत्व
आपल्याकड़े जसं वारकरी संप्रदायाने पंढरपुरच्या विठ्ठल भक्तीची पताका शतकानुशतके खांद्यावर वाहिली आहे तशी येथे राजगोपालस्वामीची भजने अलवार संतांनी केली नाही अशी एक खंत व्यक्त केली जाते.वास्तविक अलवार हे वैष्णव संत मानले जातात. कदाचित कालाच्या ओघात त्यांची भक्तिगीते किंवा अभंग नष्ट झाली असतील. मात्र विजयनगरच्या साम्राज्यातील सुप्रसिद्ध कन्नड़ हरीदास श्री पुरंदर दासारू यांनी राजगोपालस्वामी या देवाची महती वर्णन करणारी ‘कंदे मन्नारू कृष्णा ना…’ आणि ‘मन्नारू कृष्णा नेगे मंगला …’ ही दोन भजनं अनेक शताकानंतर आजही आवडीने म्हटली जातात.
लेखक – विजय गोळेसर मोबा ९४२२७६५२२७
Worlds Biggest Temple Rajagopalaswamy temple by Vijay Golesar