नवी दिल्ली – आजच्या काळातील मुले अत्यंत हुशार आहेत, असे म्हटले जाते, याचा प्रत्यय आपल्याला वारंवार येतो, अनेक लहान मुले वेगळ्या प्रकारचे छंद जोपासून आगळावेगळा विक्रम करतात, तर काही मुले विविध स्पर्धा किंवा परिक्षेत उत्तुंग यश मिळवून थक्क करून सोडतात, असाच एक विश्वविक्रम मूळचा भारतीय पण सध्या परदेशात असलेल्या एका लहान मुलाने केला असून त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सध्या दुबईत राहणाऱ्या भारतीय वंशाच्या आठ वर्षीय अरमान नायक याने हा विश्वविक्रम केला आहे. जगातील सर्व १९५ देशांच्या राजधानी आणि खंडांची नावे पटापट सांगून हा विक्रम केला आहे. अरमानने संयुक्त राष्ट्रांनी मान्यता दिलेल्या या सर्व देशांची नावे आणि त्यांच्या राजधानीची नावे केवळ पाच मिनिट सात सेकंदात सांगितली. याबद्दल ओएमजी रेकॉर्ड बुकने अरमानच्या प्रतिभेचे कौतुक केले असून संस्थेच्या २०२१ च्या आवृत्तीत त्याला स्थान दिले आहे.
ऑनलाईन (आभासी) कार्यक्रमात हा विक्रम नोंदवण्यात आला. विशेष म्हणजे सदर कार्यक्रम फेसबुक, यूट्यूब आणि लिंक्डइनवर थेट प्रसारित करण्यात आला. अरमानचा जन्म १४ डिसेंबर २०१२ रोजी ओडिशामध्ये झाला असून सध्या तो दुबईमध्ये इयत्ता तिसरीत शिकत आहे. त्याचा जागतिक विक्रमापर्यंतचा प्रवास सुमारे १२ महिन्यांपूर्वी त्याच्या पालकांच्या मदतीने सुरू झाला.
अरमानचे वडील सौम्या रंजन नायक हे सध्या दुबईत एमिरेट्स ग्लोबल अॅल्युमिनियममध्ये वरिष्ठ सुरक्षा अधिकारी आहेत, तर तिची आई महाश्वेता महापात्रा सिव्हिल इंजिनिअर आहे. अरमान २०१७ मध्ये दुबईला आला तेव्हा केवळ चार वर्षांचा होता. त्याला भारतातील नागरी उड्डयन विभागात आपली करिअर (कारकीर्द ) घडवायची आहे. भारतीय शास्त्रज्ञ डॉ. सतीश धवन आणि माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या जीवनाचा अरमानवर खूप प्रभाव आहे.