मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – इटली येथे दिनांक ९ ते १७ ऑगस्ट दरम्यान ७ व्या ज्यूनीयर गटाच्या विश्व ब्रीज चॅम्पियनशिप स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या विश्व ब्रीज चॅम्पियनशिपमध्ये १६ वर्षे, २१ वर्षे २६ वर्षे अश्या तीन वयोगटांचा समावेश होता. या स्पर्धेत भारताच्या खेळाडूनी सुंदर खेळाचे प्रदर्शन करून तीन सुवर्णपदके, दोन रजत पदके आणि एक कास्य पदक पटकावून ब्रीज खेळामद्धे विश्वात भारताचा झेंडा फडकावला. १६ वर्षे गटामध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नाशिकच्या साक्षी जहागीरदार, मुंबईच्या पावन गोयल, कर्नाटकच्या नचिकेत मुथूस्वामी, पश्चिम बंगालच्या तीर्थराज चौधरी या खेळाडूनी आपआपसात चांगला समन्वय साधून सुंदर खेळाचे प्रदर्शन करून कास्य पदक पटकावले. भारताच्या या यशामध्ये नाशिकची राशी जहागीरदार आणि मुंबईचा पवन गोयल यांचा मोलाचा वाटा आहे.
याशिवाय २६ वर्षे गटामध्ये भारताच्या कल्पना गुर्जरने सर्वात जास्त गुण मिळवून वैयक्तिक गटामध्ये थेट सुवर्णपदक आपल्या नांवे केले. तर पेअर प्रकारात भारताच्या सत्यपान कुशहारी आणि संगणिक रॉय यांनी सुरवातीपासूनच आपआपसात चांगला समन्वय राखून भारताला सुवर्ण पदक मिळविण दिले. तर १६ वर्षे मुलींच्या गटामध्ये पेअर प्रकारात भारताच्या अंशूल भट आणि रेखा भीमानायक यांनी चांगला खेळ करून या गटात सुवर्ण पदक मिळविले. याचप्रमाणे २६ वर्षे मुलींच्या गटात भारताच्या कल्पना गुर्जर आणि विद्या पटेल या जोडीने सुंदर खेळ करून रजत पदक मिळविले. तर फ्लाइट “ब” गटामध्ये भारताच्या शौनक रॉय आणि प्रीतम दास या जोडीने सुंदर खेळ करून या गटात रजत पदक मिळविले.
भारताच्या खेळाडूंना प्रशिक्षक अनिरुद्ध सांझगिरी यांचे आणि भारताच्या संघाचे प्रमुख हेमंत पांडे, विनय देसाई, सत्यकुमार आयंगार, केशव सामंत, बिंदिया नायडू यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. भारतीय खेळाडूंच्या या कामगिरीबद्दल बोलतांना हेमंत पांडे यांनी सांगितले की ब्रीज हा बुद्धीला चालना देणार खेळ आहे. आय. टी. क्षेत्रात असलेले विद्यार्थी या खेळामध्ये सहभाग जास्त प्रमाणात आहे. त्यामुळे या बुद्धीला चालना देणाऱ्या खेळामध्ये भारतात ज्यूनीयर खेळाडूंमध्ये चांगली रुची दिसून येत आहे. गेल्या तीन–चार वर्षामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताच्या वारिष्ट खेळाडूंबरोबर ज्यूनीयर खेळाडूंचीही चांगली कामगिरी दिसून येत आहे. यासाठी ब्रीज फेडरेशन ऑफ इंडियाच्या माध्यमातून ज्यूनीयर खेळाडूसाठी विविध स्पर्धा, प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन केले जात आहे. या विश्व स्पर्धेच्या आधी फेडरेशनने तज्ञ मार्गरदर्शकांच्या मार्फत खेळाडूना प्रशिक्षण दिले आहे. त्यामुळे भारताच्या खेळाडूंची चांगली कामगिरी नोंदवता आली आहे असे सांगितले.