नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- भारतीय खेल प्राधिकरण (स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया) ही क्रीडा क्षेत्रातील शिखर संस्था आहे. या भारतीय खेल प्राधिकरण आणि खेलो इंडिया यांच्या अधिपथ्याखाली महाराष्ट्र ज्युदो असोसिएशन आणि नाशिक जिल्हा ज्युदो असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १ ते ३ सप्टेंबर, २०२४ दरम्यान नाशिकच्या स्व. मीनाताई ठाकरे विभागीय क्रीडा संकुल, हिरवाडी, पंचवटी येथे महिलांच्या पश्चिम विभागाच्या खेलो इंडिया वूमेन्स लीग ज्यूदो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. जास्तीत जास्त मुलीचा सहभाग वाढावा यासाठी भारतीय क्रीडा प्राधिकरण यांच्यामार्फत ” अस्मिता वूमेन्स लीग” या नावाने गेल्या चार वर्षांपासून महिलांसाठी या विशेष स्पर्धेचे आयोजन केले जात आहे. या स्पर्धेमध्ये यजमान महाराष्ट्रासह गोवा, मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, गुजराथ, दीव-दमण या सात राज्यांचे ९०० खेळाडू सहभागी होणार आहेत.
या पश्चिम विभागीय राष्ट्रीय स्पर्धेला चांगली प्रसिद्धी मिळावी यासाठी या पत्रकार परिषेदेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी महाराष्ट्र ज्युदो असोसिएशनचे अध्यक्ष धनंजय भोसले, सरचिटणीस शैलेश टिळक, राज्य ज्युदोचे खजिनदार रवींद्र मेतकर, नाशिक जिल्हा ज्युदो असोसिएशनचे सचिव डॉ. रत्नाकर पटवर्धन, साईचे प्रशिक्षक विजय पाटील, प्रशिक्षक तथा स्पर्धा आयोजन प्रमुख योगेश शिंदे, या स्पर्धेसाठी खास निमंत्रित टॅलेंट हंट आणि तांत्रिक समितीचे प्रमुख योगेश धाडवे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी शैलेश टिळक, धनंजय भोसले यांनी स्पर्धेच्या आयोजनाबद्दल माहिती दिली, योगेश धाडवे यांनी तांत्रिक बाबींची माहिती दिली. या स्पर्धा केवळ महिलांसाठी असून यामध्ये सब ज्युनियर,कॅडेट, ज्यूनीयर आणि सिनियर असे चार गट असणार आहेत.
या स्पर्धेचे उदघाटन रविवार दिनांक १ सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या हस्ते आणि नाशिकचे आमदार राहुल ढिकले, देवयानी फरांदे, सीमा हिरे ,राहुल आहेर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.