इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – कौटुंबिक छळ आणि शारिरीक अत्याचाराची एक गंभीर घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे याच संशयित आरोपी हा निवृत्त सनदी अधिकारी आहे. याप्रकरणी सूनेने पोलिसांकडे तक्रार केली आहे. या तक्रारीत अतिशय गंभीर बाबी तिने नमूद केल्या आहेत.
मध्य प्रदेशात राहणाऱ्या महिलेने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, २४ नोव्हेंबर २०२१ रोजी भोपाळमध्ये तिचे लग्न झाले. लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी तिला हे कळून चुकले की तिचा नवरा नपुंसक आहे. तो शारिरीक संबंध ठेवण्यासाठी सक्षम नाही. विशेष म्हणजे, सासरच्या व्यक्तींनी ही बाब जाणिवपूर्वक लपवून ठेवली. लग्नापूर्वी ती मला किंवा आमच्या कुटुंबियांना सांगितली नाही. निवृत्त सनदी अधिकारी असलेल्या सासऱ्याने माझ्याशी जबरदस्तीने शारिरीक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला. या घाणेरड्या प्रकाराला मी प्रतिसाद देत नसल्याने सासरच्यांनी माझ्या चारित्र्यावर शिंतोडे उडविले आणि अनेक प्रश्न उपस्थित केले. या सर्व प्रकारात पतीही सासरच्याच बाजूने होते. त्यामुळे मी एकटी पडले. त्यातच काही दिवसातच माझ्याकडे ७ लाख रुपये आणि फॉर्च्युनर कारची मागणी करण्यात आली. तसेच, मला रोज मारहाणही सुरू करण्यात आली. एके दिवशी मला घरातून हाकलून दिल्याचे महिलेने तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी महिलेने वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडेही तक्रार नोंदवली आहे.
दरम्यान, सूनेने केलेले आरोप निराधार असल्याचे निवृत्त सनदी अधिकाऱ्यासह त्याच्या कुटुंबियांनी म्हटले आहे. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करीत आहेत.