इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – लाचखोरीची कीड अतिशय खोलवर रुजली असून काहीही केल्या की कमी होत नसल्याचे दिसून येत आहे. अनेक वेळा त्याचा प्रत्यय येतो. वास्तविक पोलिस खात्यातील काही कर्मचारी आणि अधिकारी चांगले असतात परंतु अशा लाचखोर वृत्तीच्या कर्मचाऱ्यांमुळे पोलीस खाते बदनाम होते आहे.
उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये महिला पोलीस उपनिरीक्षक भारती सिंहचा लाच घेतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये ती पाच हजार रुपये घेताना दिसत आहे. याबाबत पीडितेने मुख्यमंत्री (सीएम) पोर्टलवर तक्रार केली. त्याची तत्काळ दखल पोलिस अधिक्षकांनी घेतली. त्यामुळेच या महिला पोलिस उपनिरीक्षकाला निलंबित करण्यात आले आहे.
गोंडा अलीगढ येथील महिला कोतवाली येथे एका कुटुंबावर हुंड्यासाठी छळ केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा तपास महिला पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षक भारती सिंग करत होती. या प्रकरणात नाव असलेल्या व्यक्तींकडून भारती सिंहने ७० हजार रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे. संबंधित व्यक्तींनी पैसे देण्यास नकार दिल्याने भारती सिंहने त्यांना खोट्या प्रकरणात अडकवण्याची धमकी दिली.
त्यामुळे संबंधितांनी भारती सिंहला धडा शिकविण्याचा चंग बांधला. एका महिलेच्या माध्यमातून गावाबाहेर भारती सिंहला पाच हजार रुपयांची लाच देण्यात आली. या सर्व प्रकाराचा व्हिडिओ तयार करण्यात आला. त्यानंतर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला. हा व्हिडिओ सीएम पोर्टलवर टाकण्यात आला. अखेर त्याची दखल हाथरसचे पोलिस अधिक्षक विकास कुमार वैद्य यांनी घेतली. ते म्हणाले की, महिला उपनिरीक्षक भारती सिंहचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या तपासात प्रतिवादीला फायदा मिळवून देण्यासाठी ती एका महिलेसोबत पैशांचा व्यवहार करताना दिसत आहे. ही कृती संशयास्पद वाटते. हा व्हिडिओ काही दिवसांपूर्वीचा आहे. भारती सिंह हिला तत्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले आहे. तसेच तिच्यावर विभागीय कारवाई करण्याचेही निर्देश देण्यात आले आहे.