मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – परिवहन विभागातील भ्रष्टाचाराबाबत सातत्याने आरोप होत असल्यामुळे गृह विभाग मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. राज्यात सध्या सुरू असलेले चेकपोस्ट बंद करण्यावर गृह विभाग अतिशय गंभीर आहे. यासंदर्भातील हालचालींना वेग आला आहे.
राज्यातील चेकपोस्टची आवश्यकता तसेच कार्यप्रणालीचा अभ्यास करण्यासाठी पाच सदस्यांच्या अभ्यास गटाची नेमणूक करण्यात येणार आहे. तसेच, हा अभ्यास गट येत्या तीन महिन्यात अहवाल सादर करणार आहे. यासंदर्भातील सर्व सूचना परिवहन विभागाला देण्यात आल्याचे समजते. केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्रालयाने याबाबत पत्र दिले होते. याच पत्राचा आधार घेत गृहविभागाने परिवहन विभागाला पुढील कार्यवाहीसाठी पत्र दिल्याचे सांगितले जात आहे. चेक पोस्ट बंद झाल्यास काय परिणाम होतील, त्यावर काय तोडगा काढता येईल, सरकारच्या महसूलावर किती परिणाम होईल आदींचा सारासार विचार करण्यात येणार आहे.