नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आपली शेती आपणच करायची असा निर्धार करीत सुनीता यांनी बटाईचा मार्ग नाकारला. श्रमाचा वसा घेऊन त्यांनी कष्टाने स्वत:चा मळा आणि संसार फुलवला. अशा जिद्दी नवदुर्गेची ही प्रेरक कथा..
दिंडोरी येथील शाळेत ९वी पर्यंत शिक्षण झाल्यानंतर सुनिता यांचा वरखेडा येथील दिलीप सोनवणे यांच्याशी विवाह झाला. सासरी आल्यानंतर घरी सासू-सासरे, लहाने दीर व पती असे कुटुंब होते. त्यासोबत घरी १५ एकर शेती होती पण या शेतीला बटाईने करायला दिले जात होती. ही गोष्ट सुनीता यांच्या मनात कुठेतरी अस्वस्थता निर्माण करत होती. घरची १५ एकर शेती आणि सोबत पाण्याची चांगली व्यवस्था असताना ती इतर व्यक्तींना बटाईने करायला देणे सुनीता यांना खटकत होते. त्यानंतर आपली घरची शेती स्वतः कसण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यांच्यासोबत लहाने दीर वसंत सोनवणे यांनीदेखील या निर्णयास पाठिंबा दिला.
दीर वसंत हे तेव्हा ७वीत शिकत होते. वयाने लहान असले तरी ते शेतीकामात चांगली साथ देत होते. बटाईने दिलेल्या शेतीत ऊस लावला जायचा. त्यात त्यांनी बदल केला. त्यामध्ये द्राक्षशेती करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. द्राक्षबाग नव्याने उभी करण्यासाठी भांडवलाची गरज होती. भांडवल उभारणीसाठी सुरुवातीला कर्ज घेतले. त्यातून सुरूवातीला एक एकर क्षेत्रात थॉमसन व्हरायटीची बाग उभी केली. उर्वरित क्षेत्रात भाजीपाला पिकांची लागवड केली. लग्नानंतर २ वर्षांतच सासऱ्यांचे निधन झाले. याच काळात पती मद्याच्या व्यसनाच्या आहारी गेले होते. या परिस्थितीत त्यांच्या समोरील आव्हाने वाढली होती. त्या एकाच वेळी अनेक आव्हानांशी लढत होत्या. त्यापैकी एक आव्हान होते ते पतीला व्यसनातून बाहेर काढणे. त्यावेळी भांडवलाचा तुटवडा असल्याने शेतीकामासाठी मजूर बोलवता येणे शक्य नव्हते.
अशा परिस्थितीत सर्व काम स्वतःच करत. किडनाशकाची फवारणी करण्यासाठी मशीन नसल्याने गटोर सारख्या हाताने वापरणाऱ्या संयंत्राच्या साह्याने फवारणी केली जात होती. पाण्यासाठी बाजूला असलेल्या नदीमधून पाणी वाहून आणावे लागत. ही सर्व मेहनत घेत असताना पहिल्या वर्षी या एक एकरात द्राक्षबागेचे चांगले उत्पन्न आले. पहिल्या एक एकरात आलेले उत्पन्न पाहता पुढे द्राक्षबाग वाढवण्यात आली. २००९ पासून पुढे द्राक्ष निर्यात केली जाऊ लागली.
शेतीत होत चाललेला बदल बघता पती दिलीप यांनीदेखील व्यसन सोडले आणि शेतीमध्ये ते मदत करू लागले. ही गोष्ट सुनीता यांच्यासाठी दिलासादायक होती पण काही वर्षांतच २०१५ मध्ये पती दिलीप यांचे आजारपणाने निधन झाले. पतीच्या निधनानंतर शेतीसोबत त्यांच्या तीनही मुलांची जबाबदारी सुनीता यांच्यावर आली. हे वर्ष अतिशय कठीण होते कारण त्याच वर्षी द्राक्षबागेचे देखील गारपिटीने मोठे नुकसान झाले होते. सोबत २०१४ मध्ये नवीन जमीन घेण्यासाठी कर्ज घेतले होते त्यामुळे हे वर्ष तोट्यात गेले. सुनीता यांच्या आयुष्यातील शेती आणि कुटुंब हे दोनही खांब या घटनांमुळे कमकुवत झाले होते. हा काळ जरी कठीण होता तरी परिस्थितीला जिद्दीने सामोरे जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला.
पुढच्या वर्षी शेतीत पूर्ण मेहनत करत संपूर्ण द्राक्षांची निर्यात करत चांगले उत्पन्न त्यांनी कमवले आणि दोन वर्षांतच मागील सर्व कर्ज फेडले. त्यानंतरही शेतीत अडचणी येत राहिल्या पण कुटुंबाचा असलेल्या भक्कम आधारामुळे संकटकाळात देखील मार्ग काढण्याचे सामर्थ्य सुनीता यांच्यामध्ये आलेले होते. चढउतार राहिलेल्या या शेतीत कष्ट करत १५ एकराचे असलेले क्षेत्र आज २० एकरांवर वाढवले आहे. त्यात टोमॅटो, द्राक्ष, भोपळे या सर्व पिकांची लागवड केली जात आहे. आज घरातील सर्व मुलं उच्चशिक्षण घेत आहेत. काही वर्षांपूर्वी सुनीता यांच्या ‘आपली शेती आपणच करायची’ या एका निर्णयामुळे पूर्वी बटाईने दिली जाणारी ही शेतीच आज या कुटुंबाचा मुख्य आर्थिक स्त्रोत बनली आहे.
Women Farmer Sunita Sonawane Success Story