धुळे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिंदखेडा येथील तहसीलदार सुनील सौंदाणे अडचणीत आले आहेत. त्यांची पत्नी वैशाली सौंदाणे यांनी त्यांच्यावर अतिशय गंभीर आरोप केले आहेत. पती सुनील सौंदाणे यांनी एका महिलेशी अनैतिक संबंध ठेऊन तिला पत्नीचा दर्जा दिला आहे. यासाठी त्यांनी कागदोपत्री फेरफार केले आहेत. शिवाय अनैतिक संबंधातून झालेल्या मुलीला त्यांनी स्वतःचे नावही दिले आहे. याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई करावी, अन्यथा १ मे पासून आपल्या मुलांसह उपोषण करण्याचा इशारा वैशाली सौंदाणे यांनी दिला आहे. याप्रकरणी त्यांनी मुख्यमंत्री, महसूलमंत्री, महसूल विभाग आयुक्त, जिल्हाधिकारी आदींना निवेदन दिले आहे.
वैशाली सौंदाणे यांनी त्यांच्या तक्रारीत म्हटले आहे की, मी वैशाली सुनील सौंदाणे शिंदखेडा येथील तहसीलदार सुनील सौंदाणे यांची धर्मपत्नी आहे. आम्हाला मुलगी अनघा वय 19 वर्ष , व मुलगा आदित्यवर्धन वय 13 वर्ष , अशी दोन अपत्ये आहेत. आमचे दोघांचे अजूनही लग्न संबंध टिकून असून कोणत्याही प्रकारची कायदेशीर फारकत झालेली नाही. असे असताना माझे पती तहसीलदार सुनील सौंदाणे यांनी मीना बोडके या नावाच्या महिलेशी अनैतिक संबंध ठेवून तिला कागदोपत्री फेरफार करून पत्नीचा दर्जा देण्याचा कारनामा केला आहे. अनैतिक संबंधातून त्यांना एक मुलगी देखील झाली असून तिला देखील वडिलांचे नाव तहसीलदार सुनील सौंदाणे यांनी लावले आहे. याची तक्रार मी अनेक महिन्यांपासून महसूल खात्याला दिली आहे.
याची दखल घेऊन महसूल आयुक्त यांनी वर महसूल प्रशासनाला पाठवले. यात यांना दोन नसून चार मुले आहेत.हे सिद्ध झालेले आहे. त्यांची फाईल महसूल मंत्री महोदय यांच्या केबिनला गेल्यात दोन-तीन महिन्यांपासून धूळ खात पडलेली आहे. तरीदेखील यांच्यावर कुठलीही प्रशासकीय कार्यवाही होत नाही. ना निलंबन बडतर्फ. या फाईल सोबत सर्व महत्वाचे पुरावे जोडलेले असूनही प्रशासन का कार्यवाही करत नाही? तसेच मीना बोडके उर्फ मीनल सौंदाणे ओमकार मिश्रा उर्फ हर्षवर्धन सौंदाणे व इतर यांनी शासकीय कागदपत्रांमध्ये फेरफार केले म्हणून देवपूर पोलिस स्टेशन धुळे मागील वर्षापासून तक्रार दिलेली आहे. आजही पाठपुरावा सुरू आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा. तरीदेखील यांच्यावर गुन्हा दाखल करत नाही सर्व पुरावे दिले तरी. त्यांनी मीना बोडके ला पत्नी दर्जा देऊन अनधिकृतपणे घरात ठेवून पती-पत्नी सारखे व्यवहार सुरु ठेवले आहेत.
या अनैतिक संबंधामुळे माझे पती सुनील सौंदाने यांनी माझ्यासह आमच्या दोन मुलांना आठ वर्षापासून लांब ठेवले आहे. त्यामुळे मुलांचे शिक्षण, दैनंदिन संसाराच्या खर्च भागविणे अडचणीचे ठरत आहे. पहिली पत्नी हयात असताना अनधिकृतपणे दुसरी पत्नी करणे हा गुन्हा तर सुनील सौंदाणे यांनी केलाच आहे, पण त्याच बरोबर तहसीलदार या पदाचा दुरुपयोग करून त्यांनी जात बदलून अनैतिक संबंधातून जन्मलेल्या मुलांना नाव देणे, कागदोपत्री फेरफार करून शासनाची फसवणूक करणे असे गंभीर स्वरूपाचे अपराध केले आहेत. याचा सर्व पुराव्यानिशी मी देवपूर धुळे व शिंदखेडा पोलिस ठाण्यात न्याय मागण्यासाठी तक्रारी अर्ज दिले आहेत. परंतु संबंधित यंत्रणेने अद्यापही कोणतीही कार्यवाही केलेली नाही. या सर्व बाबींचा पुरावा घेऊन मी माझ्या दोन्ही मुलांसह दिनांक 1 मे 2022 रोजी महाराष्ट्र दिनी आपल्या न्याय हक्कासाठी धुळे शिंदखेडा तहसील कार्यालयासमोर उपोषणास बसणार आहे. या काळात आमच्या जीवाला धोका पोहचल्यास किंवा कमी जास्त काही झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी तहसीलदार सुनील सौंदाने व त्यांनी ठेवलेली मीना बोडक, ओमकार मिश्रा,या महिलेसह तिच्या व यांच्या नातेवाईकांची राहील, असे वैशाली सौंदाणे यांनी तक्रारीत म्हटले आहे.