त्र्यंबकेश्वर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बारा ज्योतिर्लिंग पैकी एक असलेले श्री त्र्यंबकेश्वर मंदिर अतिप्राचीन श्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे संवर्धन करण्यासाठी व मंदिराच्या देखभालीच्या कामासाठी दि.५ जानेवारीपासून ते १२ जानेवारीपर्यंत पूर्णपणे बंद करण्यात आले होते. संबंधित संवर्धन काम पूर्ण झाल्यामुळे आता मंदिर भाविकांना दि. १३ जानेवारी २०२३ सकाळी ७ वाजेपासून पुन्हा खुले करण्यात येणार आहे. दरम्यानच्या काळात भारतीय पुरातत्त्व खात्यामार्फत शिवलिंगावर वज्रलेप करण्यात आला आहे. तसेच गर्भगृहास चांदीचे दरवाजे बसविण्यात आले आहेत.
सदरील दरवाजे औरंगाबाद येथील प्रसिद्ध उद्योजक शेखरजी देसरडा यांनी त्र्यंबकेश्वर चरणी अर्पण केले आहेत. त्याशिवाय मंदिराच्या सभामंडपात असलेला हर्षमहाल ही दर्शनासाठी दररोज उघडा ठेवण्यात येणार आहे. दररोज रात्री शयनारती झाल्यानंतर भगवान त्र्यंबकराज शयनासाठी हर्षमहालात येतात अशी परंपरा आहे. हा हर्षमहाल म्हणजे सिसम आणि सागवानी लाकडावर केलेल्या अप्रतिम कलाकुसरीचा एक उत्कृष्ट नमुना आहे. त्याचेही पूनः सौंदर्यकरण आणि नूतनीकरण केले आहे. तो भाविकांना वर्षातून तीन वेळाच भाविकांना पाहता येत होता, आता तो भाविकांना दररोज दर्शनासाठी खुला करण्यात येत आहे.
सभामंडपातील दर्शनरांगेसाठी बसविण्यात आलेल्या लोखंडी रेलिंग्ज काढून स्टेनलेस स्टीलच्या रेलिंग्ज बसविण्यात आल्या आहेत. सदरची विकासकामे ट्रस्टचे अध्यक्ष जिल्हा न्यायाधीश श्री विकास कुलकर्णी व विश्वस्त मंडळाच्या नेतृत्वाखाली व पुरातत्त्व खात्याच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. तरी सर्व भाविकांनी याची नोंद घ्यावी अशी विनंती विश्वस्त मंडळातर्फे करण्यात आले आहे.
ज्योतिर्लिंगाचे संवर्धन निमित्ताने विविध अनुष्ठाण संपन्न
कोणतेही शुभकार्य निर्विघ्नपणे संपन्न होण्याकरीता परमेश्वराचे आशिर्वाद घेणे, हि आपली संस्कृती आहे. यासाठी पुजा, अनुष्ठाण, पारायणे अशा विविध प्रकारच्या पुजा संपन्न केले जातात. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले श्री त्र्यंबकेश्वर मंदिर अतिप्राचीन श्री ज्योतिर्लिंगाचे देखभाल संवर्धन करण्यासाठी व मंदिराच्या देखभालीच्या कामासाठी दि. ५ जानेवारी २०२३ ते १२ जानेवारी २०२३ पर्यंत पूर्णपणे आठ दिवस बंद ठेवण्यात आले आहे. सदरचे संवर्धनाचे काम त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट व भारतीय पुरातत्त्व खात्यामार्फत करण्यात येत आहे. सदरचे काम निर्विघ्नपणे होण्याकरता दि. ७ जानेवारी ते १५ जानेवारी पर्यंत त्र्यंबकेश्वर पुरोहित संघाच्या वतीने नगरीतील सर्व पुरोहितांनी मिळून विविध मंदिरांमध्ये अनुष्ठाण संपन्न केले. पेशवेकालीन बल्लाळेश्वर गणपतीला अभिषेक, आदिमाया पार्वती स्वरुप श्री निलांबिका देवीला नवचंडी याग, तसेच श्रीत्रिसंध्येश्वर ( क्षेत्रपाल ) येथे महारुद्र व महामृत्युंजय जप आदी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
महारुद्र अनुष्ठाण निमित्ताने वेदमाता गायत्री देवी मंदिरा जवळ श्रीत्रिसंध्येश्वर मंदिरात श्री गणपती पुजन, श्री वरुण पुजन, पुण्याहवाचन, संल्पपुर्ती करुन महारुद्र अनुष्ठाणाला सुरुवात करण्यात आली. दुपारी १ ते सायं. ६ वाजेपर्यंत अनुष्ठाण संपन्न करण्यात आले. गावातील सर्वशाखीय पुरोहितांनी येथे येउन आपली सेवा भगवान त्र्यंबकराजाचे चरणी अर्पित केली. सायंकाळच्या सुमारास श्रीत्रिसंध्येश्वर महादेवाचे पिंडीवर सप्तधान्य पुजा संपन्न कण्यात आली, महानैवेद्य अर्पण करुन आरती करण्यात आली. यावेळी पुरोहित संघाचे अध्यक्ष वेदमुर्ती मनोज थेटे यांचेसह संघाचे पदाधिकारी, गावातील समस्त पुरोहित मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Will Trimbakeshwar Temple Open or not from Tomorrow