नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील तिन्ही कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा केली आहे. ही घोषणा म्हणजे, गेल्या ३६० दिवसांपासून सुरू असलेल्या लढ्याचे हे यश असल्याचे सांगितले जात आहे. राजधानी दिल्लीच्या सीमेवर पंजाब आणि हरियाणातील शेतकऱ्यांनी अतिशय संयमी पद्धतीने आंदोलन सुरू ठेवले आहे. पंतप्रधान मोदी यांनी आज सकाळीच कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेले शेतकरी आंदोलन समाप्त होणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
शेतकरी आंदोलनाचे नेतृत्व करणारे राकेश टिकैत यांनी म्हटले आहे की, शेतकरी आंदोलन तत्काळ मागे घेतले जाणार नाही. ज्या दिवशी तिन्ही कृषी कायदे संसदेत रद्द होतील, त्या दिवसाची आम्ही वाट पाहू. त्याशिवाय केंद्र सरकारने किमान आधारभूत मूल्य (एमएसपी) यासह अन्य कृषी प्रश्नांवर चर्चा करावी, असे आवाहनही टिकैत यांनी केले आहे. म्हणजेच, आज शेतकरी आंदोलन मागे घेतले जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
https://twitter.com/RakeshTikaitBKU/status/1461550402793455617