नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिकमध्ये शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाला प्रचंड मोठा धक्का बसला आहे. नाशिक शहर हा शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो. महापालिकेतील तब्बल १२ नगरसेवकांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देत शिंदे गटाच्या बाळासाहेबांची शिवसेना मध्ये प्रवेश केला आहे. खरे तर हे सर्व जण यापूर्वीच ठाकरे गटाला सडचिठ्ठी देणार होते. मात्र, काही कारणामुळे हा प्रवेश लांबला. दरम्यानच्या काळात ठाकरे गटाचे आक्रमक नेते, खासदार व उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख संजय राऊत यांचे दोन नाशिक दौरे झाले. या दौऱ्यात राऊत हे डॅमेज कंट्रोल रोखतील, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. पण तसे झाले नाही.
ठाकरे गटाला मतदारांची सहानुभूती असल्याचे बोलले जाते. तसेच, शिंदे-फडणवीस सरकार फार काळ टिकणार नाही, अशी अटकळही बांधली जाते. अशा परिस्थितीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत या १२ नगरसेवकांनी शिंदे गटात का प्रवेश केला असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे, ठाकरे गटाचे महाविकास आघाडीमध्ये असणे. महाविकास आघाडीमुळे आपले नगरसेवकपद आणि आगामी कारकीर्द धोक्यात येऊ शकते अशी मोठी भीती ठाकरे गटाच्या अनेक नेत्यांना आहे. त्यातीलच काही नेते आता ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देत आहे.
मुंबई, नाशिक, पुणेसह राज्यातील महत्त्वाच्या महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका लवकरच होणार आहेत. या निवडणुका ठाकरे गटाने जर महाविकास आघाडी सोबत लढवायचे निश्चित केले तर ठाकरे गटातील अनेक नेत्यांची पंचाईत होणार आहे. कारण, जागांच्या विभागणीत आपल्याच भागातील दावेदारी धोक्यात येऊ शकते. म्हणजेच, जिथे आपण उमेदवारी करु शकतो ती जागा काँग्रेस किंवा राष्ट्रवादीला जाऊ शकते. मग, आपल्या भवितव्याचे काय, अशी दाट शंका या नेत्यांना सतावते आहे. संजय राऊत यांना नाशिक दौऱ्यात या सर्व नेत्यांची समजूत काढण्यात अपयश आले आहे. ठाकरे गट आगामी निवडणुका महाविकास आघाडी सोबत लढणार की स्वबळावर हे अद्यापही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलेले नाही. त्यामुळेच ठाकरे गटातील अनेक नेते संभ्रमात आहेत. तळ्यात-मळ्यात राहण्यापेक्षा आताच शिंदे गटात जाऊन आगामी निवडणुकीची जोरदार तयारी करता येईल, असे या नेत्यांना वाटते. कारण, आगामी निवडणुका या शिंदे गट भाजप सोबत लढणार आहे. त्यामुळे ज्या शिवसेनेच्या जागा आहेत त्यावर भाजप दावा करणार नाही. परिणामी, आपली जागा सुरक्षित राहिल, असे या नेत्यांना वाटते. म्हणजेच असुरक्षिततेच्या भावनेतून ठाकरे गटाला गळती लागली आहे. आणि त्याचा थेट फायदा शिंदे गटाला होत आहे.
या नेत्यांनी दिली ठाकरे गटाला सोडचिठ्ठी
माजी विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते,
माजी नगरसेवक सूर्यकांत लवटे,
माजी स्थायी समिती सभापती रमेश धोंगडे,
माजी नगरसेवक सुदाम ढेमसे,
माजी नगरसेवक श्यामकुमार साबळे,
माजी प्रभाग सभापती चंद्रकांत खाडे,
माजी नगरसेवक सुवर्णा मटाले,
माजी नगरसेवक पुनम मोगरे,
माजी नगरसेवक जयश्री खर्जुळ,
माजी नगरसेवक ज्योती खोले,
माजी नगरसेवक प्रताप मेहरोलिया,
राजू लवटे
मुंबईच्या सकाळच्या भोंग्याचे नाशिककर बारा वाजवणार ….
नाशिक महापालिकेच्या १२ नगरसेवकांचा मा . मुख्यमंत्री ना . एकनाथ शिंदे यांना पाठिंबा … सकाळी ८ वाजता #बाळासाहेबांची_शिवसेना पक्षात प्रवेश करणार …@nareshmhaske @mieknathshinde @OfficeofUT @rautsanjay61 @Dev_Fadnavis pic.twitter.com/Fs4KDeKS5C— Naresh Mhaske (@nareshmhaske) December 15, 2022
why Thackeray group leaders Join Shinde group Politics
Nashik Uddhav Thackeray Eknath Shinde Upcoming Elections